आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या आयुषच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचा आर्क्टिक प्रदेशापर्यंत विस्तार : रेक्जाविक परिषदेत एकात्मिक आरोग्य सहकार्यासाठी भारताचा नेतृत्वाच्या भूमिकेतून पुढाकार


आर्क्टिक सर्कल असेंब्ली 2025 मध्ये आयुष संशोधन आणि कल्याण विषयक सहकार्याची छाप

Posted On: 17 OCT 2025 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025

आइसलँडच्या रेक्जाविक इथे 2025 च्या आर्क्टिक सर्कल असेंब्लीचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक प्राध्यापक (वैद्य) रबीनारायण आचार्य आणि, संयुक्त सल्लागार, आयुष मंत्रालयाचे सह सल्लागार (होमिओपॅथी) डॉ. श्रीनिवास राव चिंता हे  भारताच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून सहभागी झाले होते. 

या आमसभेदरम्यान झालेल्या आर्क्टिक क्षेत्रात ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांची भूमिका आणि महत्त्व या पूर्ण सत्रात, प्राध्यापक आचार्य यांनी भारताच्या सर्वसमावेशक आर्क्टिक धोरणांतर्गत या प्रदेशातील भारताच्या सक्रिय सहभागाविषयीचे सादरीकरण केले. आरोग्य विषयक जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी पारंपरिक औषध व्यवस्थेचे वाढते महत्त्व त्यांनी आपल्या सादरीकरणातून अधोरेखित केले. यासोबतच त्यांनी आर्क्टिक प्रदेशासारख्या अत्यंत आव्हानात्मक परिसंस्थेतही आरोग्य विषयक कल्याण आणि लवचिकतेत वृद्धी साध्य करण्यासाठी आयुष उपक्रमांची क्षमताही विषद केली.

हे सत्र भारत सरकारच्या वतीने आयोजित केले होते. यात भारत सरकारचे ध्रुव क्षेत्रीय समन्वयक रिअर ॲडमिरल टी.व्ही.एन. प्रसन्ना, राष्ट्रीय ध्रुव क्षेत्रीय आणि महासागर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मनीष तिवारी , आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एमिरेट्स पोलर प्रोग्रामचे सुकाणू समिती सदस्य वसीम सईद यांसारख्या प्रतिष्ठित वक्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्राध्यापक आचार्य यांनी पारंपरिक ज्ञान व्यवस्था आणि आर्क्टिक संशोधनातील परस्पर सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी भविष्यवेधी   दृष्टीकोन मांडला. त्यांनी आर्क्टिक प्रदेशातील वातावरणात प्रायोगिक आंतरशाखीय सिद्धता क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याचा, आर्क्टिक धोरण संरचनेअंतर्गत संयुक्त संशोधन संघ स्थापन करण्याचा तसेच आंतरसांस्कृतिक आयुष वितरण आणि सुरक्षा देखरेखीत क्षमता निर्मितीचा प्रस्ताव मांडला. पारंपरिक आणि आधुनिक औषधोपचारात दुवा साधण्यासाठी सबळ वैज्ञानिक पुरावे प्रकाशित करण्याची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली. यासोबतच  भारताच्या आर्क्टिक प्रसारविषयक मुत्सद्देगिरीत आयुष विषयक जागृतीच्या मुद्यांचा अंतर्भाव करण्याची शिफारसही त्यांनी केली. या आमसभेतील आयुष मंत्रालयाच्या शिष्टमंडळाच्या सहभागातून, जागतिक शाश्वतता आणि आरोग्य विषयक संवादांच्या प्रयत्नांमधील आयुष आधारित पुरावे, नवोन्मेष आणि मुत्सद्देगिरीचा समकालीन संदर्भ जोडण्याची भारताची वचनबद्धताही अधोरेखित झाली. या आमसभेतील सहभागातून, भारताच्या आर्क्टिक धोरण आराखड्यांतर्गत सर्वांगीण कल्याण, वैज्ञानिक सहकार्य आणि लोकांमधील परस्पर भागीदारी वृद्धींगत करणारा एक जबाबदार भागधारक म्हणून भारताचे स्थानही अधिक भक्कम झाले.

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2180345) Visitor Counter : 12