संरक्षण मंत्रालय
संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यात योगदान देणाऱ्या देशांच्या सेना प्रमुखांची परिषद 2025: संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमा अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेने नवी दिल्लीत सांगता
Posted On:
16 OCT 2025 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
भारतीय लष्कराने 14 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केलेल्या 'संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यात योगदान देणाऱ्या देशांच्या सेना प्रमुखांची परिषद 2025' ची आज नवी दिल्लीत सांगता झाली. उच्चस्तरीय विचारविनिमय, महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमा अधिक मजबूत करण्याच्या सामूहिक संकल्पाने या परिषदेचा समारोप झाला.
राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सैन्य पाठवणाऱ्या देशांच्या सेना प्रमुखांशी आणि प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतीय शांतता सैनिकांच्या सकारात्मक योगदानाचा उल्लेख करत, राष्ट्रपतींनी शाश्वत शांतता आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व सहभागी देशांचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी अधिक सहकार्य, चिरस्थायी मैत्री आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांच्या सुरक्षेसाठी सर्व भागधारकांना एकत्र आणून तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला.
तत्पूर्वी, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या भाषणात बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. "संयुक्त राष्ट्रांची शांतता मोहीम जागतिक स्थिरतेचा आधारस्तंभ असली तरी, वास्तववादी आदेश, उत्तम तंत्रज्ञान आणि शांतता सैनिकांसाठी वाढीव सुरक्षा या माध्यमातून उदयोन्मुख आव्हानांशी जुळवून घेणे आवश्यक आहे असे डॉ. जयशंकर यांनी नमूद केले.
"संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर" या विषयावरील एका संवादात्मक सत्रात यूएनटीसीसी चे प्रमुख, प्रतिनिधी आणि 15 उद्योगपती एकत्र आले. यामध्ये मोहिमांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवनवीन शोध आणि स्वदेशी उपायांच्या भूमिकेवर चर्चा झाली. उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे परिस्थितीची जाणीव, दळणवळण आणि सैनिकांची सुरक्षा सुधारण्याच्या शक्यतेवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुरुंडी, टांझानिया, पोलंड, इथिओपिया, नेपाळ आणि युगांडा या देशांच्या लष्करप्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. यूएनटीसीसी प्रमुख परिषदेचा भाग म्हणून एका संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात 9 कार्यान्वयन क्षेत्रे आणि 41 प्रदर्शक सहभागी झाले. यामध्ये विविध स्वदेशी शस्त्रप्रणाली, प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले. या प्रदर्शनातून संरक्षण उत्पादनातील भारताच्या 'आत्मनिर्भरते'वर वाढता भर दिसून आला.
तत्पूर्वी, यूएनटीसीसी प्रमुखांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन भारताच्या वीर सुपुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली. यानंतर मानेकशॉ सेंटर इथे वृक्षारोपण समारंभ झाला. तो शांतता मोहिमेच्या भावनेनुसार शाश्वतता आणि हरित भविष्यासाठीच्या संयुक्त प्रतिज्ञेचे प्रतीक होता.
परिषदेतील प्रमुख निष्कर्ष
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांनी खालील बाबींद्वारे नवीन वास्तवाशी जुळवून घेतले पाहिजे हे या परिषदेत एकमताने निश्चित करण्यात आले :






- सैन्य-योगदान देणाऱ्या राष्ट्रांना अधिक महत्त्व देऊन सर्वसमावेशक निर्णय प्रक्रिया राबवणे
- वास्तववादी आदेशांद्वारे शांतता सैनिकांचे संरक्षण आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे
- मोहिमांच्या यशासाठी स्वदेशी आणि किफायतशीर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे.
- जटिल वातावरणासाठी सैनिकांना तयार करण्याकरिता सुधारित आंतरकार्यक्षमता (interoperability) आणि प्रशिक्षण आराखडे तयार करणे.
- विश्वास, सहकार्य आणि सामायिक जबाबदारीवर आधारित चिरस्थायी भागीदारी टिकवून ठेवणे.
गोपाळ चिपलकट्टी/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180132)
Visitor Counter : 17