कायदा आणि न्याय मंत्रालय
कायदेशीर व्यवहार विभाग नूतनीकरण ऊर्जा आणि देशव्यापी सहभागासह विशेष मोहीम 5.0 राबवत आहे
Posted On:
15 OCT 2025 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
कायदेशीर व्यवहार विभागाचे कार्यालय या ऑक्टोबर महिन्यात एका नवीन ऊर्जेने चैतन्यमय झाले असून विशेष मोहीम 5.0 अंतर्गत फाईल्स आणि अर्जांच्या पलीकडे देशभरातील कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजाचा कायापालट होत आहे.
या मोहिमेला 2 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात झाली असून ती 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अंमलबजावणी टप्पा सुरु आहे, यामध्ये सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये स्वच्छतेचा कळस गाठण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाला मूर्त स्वरूप दिले जात आहे. या मोहिमेच्या प्रारंभिक टप्प्यात देखील विभागाने आपली वचनबद्धता आणि अनुपालन दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. यावर्षीच्या अभियानातून ई कचऱ्याची विल्हेवाट, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, नियम आणि प्रक्रियांचे सुलभीकरण आणि स्वच्छ, हरित आणि सहज प्रवेश मिळू शकेल अशा कार्यालयांच्या माध्यमातून लोकांना अधिक उत्तम अनुभव प्रदान करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शास्त्री भवन येथील मुख्य सचिवालयात केंद्रीय कायदे सचिव डॉ अंजु राठी राणा यांनी वैयक्तिक रित्या प्रत्येक दालन, विभाग आणि कार्यस्थळांची तसेच विशेष मोहीम 5.0 अंतर्गत सुरु असलेल्या प्रयत्नांची आणि प्रगतीची पाहणी केली, यावेळी त्यांच्या समवेत विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. स्वच्छता आणि सुव्यवस्था ही एक वेळची कामे नसून कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सुशासनासाठी या सततच्या पद्धती आहेत, यावर त्यांनी भर दिला.
या पाहणी दरम्यान, डॉ. राणा यांनी "2047 पर्यंत भारताच्या स्वप्नांचा पंच प्राण" या भित्तीचित्र प्रदर्शनाचा आढावा घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळासाठी व्यक्त केलेल्या पाच राष्ट्रीय संकल्पांची रचना या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यासाठी विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत. कायदा सचिवांनी स्वच्छता या पंचप्रणांशी कशी सखोलपणे जुळते यावर प्रकाश टाकला, विशेषतः "राष्ट्राला वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त करण्याचा" आणि "आपल्या कर्तव्यांबद्दल पूर्ण वचनबद्धता सुनिश्चित करण्याच्या " संकल्पावर त्यांनी भर दिला. 2047 मध्ये देशाला विकसित बनवण्याच्या उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी स्वच्छता, सुव्यवस्था आणि नागरी जबाबदारीची भावना आहे, याचे स्मरण हा कॉरिडॉर करून देतो.
या मोहिमे अंतर्गत हाती घेतलेल्या विविध कामांमध्ये फाईल्सची विल्हेवाट लावणे आणि डिजिटायझेशनपासून ते ई-कचरा आणि अनावश्यक साहित्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत, एका सौन्दर्यदृष्टीने आणि जबाबदारीने विभागाची वचनबद्धता दिसून आली. "स्वच्छ कार्यस्थळ स्वच्छ मानसिकता निर्माण करते - ते आपल्याला जनतेची चांगली सेवा करण्यास मदत करते," असे डॉ. राणा यांनी सांगितले.
या मोहिमेचे पडसाद दिल्लीच्या पलीकडे पोहोचले आहेत. या विभागाशी संबंधित कायदेशीर प्रतिनिधी आणि विभाग या मोहिमेला कोणत्या ना कोणत्या अर्थपूर्ण कृतीने योगदान देत आहेत. देशभरात अधिकारी आणि सल्लागारांनी आपापल्या पद्धतीने सर्जनशीलता दाखवत या मोहिमेला आकार दिला आहे. त्रिपुरा उच्च न्यायालयात, भारताचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल विद्युत मजुमदार यांनी त्यांच्या कार्यालयातील जुने रेकॉर्ड साफ करून, अनावश्यक कागदपत्रे नष्ट करून आणि कार्यालयाला वनस्पतींसह हिरवळीचा स्पर्श देऊन वैयक्तिक रित्या पुढाकार घेतला. पाटणा उच्च न्यायालयातील भारत सरकारचे वरिष्ठ पॅनेल वकील कुमार प्रिय रंजन यांनी कार्यक्षेत्राचे एका स्वच्छ, संघटित कक्षात रूपांतर केले, केस फाईल्स आणि कायद्याच्या अहवालांचे व्यवथापन काळजीपूर्वक केले , तसेच कुंडी रोपे लावून परिसराला एक वेगळेच सौन्दर्य बहाल केले. विचारपूर्वक केलेले प्रयत्न कामात स्पष्टता आणि ध्येयाप्रती ध्यास कसा आणू शकते याची ही उदाहरणे आहेत.
भारताच्या अतिरिक्त आणि उप-सॉलिसिटर जनरल आणि पॅनेल कौन्सिलच्या अनेक कार्यालयांमधून अशाच प्रकारचे प्रयत्न झाल्याचे वृत्त आले आहे, ज्यात अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वच्छ आणि सुशोभित केलेल्या कार्यस्थळांचे फोटो पाठवले आहेत - प्रत्येक प्रतिमा सामूहिक जबाबदारी आणि आपलेपणाच्या भावनेचे प्रतीक आहे. जेव्हा संपूर्ण प्रणालीमध्ये लहान वैयक्तिक उपक्रम द्विगुणित केले जातात तेव्हा ते कायमस्वरूपी संस्थात्मक बदल कसे घडवू शकतात, याचे हे स्पष्ट उदाहरण आहे.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने जारी केलेल्या सूचनांनुसार विभाग पुढील उपक्रम हाती घेईल. विशेष मोहीम 5.0 ही केवळ अनुपालनासाठीची मोहीम नाही तर विभागीय मूल्यांचे ते सामूहिक प्रतिबिंब आहे. या उपक्रमामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागारांना देशभरात अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम कार्यालयांच्या निर्मितीच्या ध्येयासाठी एकत्र आणण्यात यश आले. ही मोहीम ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याने विभाग मोहिमेच्या संपूर्ण कालावधीत आणि त्यापुढील काळातही ही गती कायम ठेवण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करेल. आता प्रत्येक कार्यक्षेत्रात स्वच्छता, कार्यक्षमता आणि जबाबदारीची कायमस्वरूपी संस्कृती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
पूर्ण निपटारा केलेली प्रत्येक फाईल, स्वच्छ केलेला प्रत्येक कोपरा आणि हरित रोपांनी सजलेले कार्यालय म्हणजे प्रशासन एका नियमाने सुरु होते आणि ज्यावेळी स्वच्छता अतिशय मनापासून आचरणात आणली जाते तेव्हा ती उत्तम प्रशासनाची सवय होऊन जाते याचे स्मरण होय.





नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179376)
Visitor Counter : 12