पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 ऑक्टोबरला गुजरातला भेट देणार
बडोदा येथे सी-295 विमानांच्या उत्पादनासाठी उभारलेल्या टाटा विमान संकुलाचे पंतप्रधान मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्घाटन होणार
ही भारतातील लष्करी विमानांसाठी उभारण्यात येणारी पहिलीच खासगी क्षेत्रातील अंतिम जुळवणी कार्ययंत्रणा असेल
पंतप्रधानांच्या हस्ते अमरेली येथे 4,900 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि कोनशीला
प्रकल्पांची मुख्य लक्ष्यित क्षेत्रे : रेल्वे, रस्ते, पाणीपुरवठा विकास आणि पर्यटन क्षेत्र
Posted On:
26 OCT 2024 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दिवशी सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांच्यासह टाटा विमान संकुलाचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. टाटा अॅडव्हांस्ड सिस्टिम्स मर्या. (टीएएसएल) या कंपनीच्या परिसरात सी-295 प्रकारच्या विमानांच्या उत्पादनासाठी हे संकुल उभारण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता ते बडोदा येथील लक्ष्मीविलास राजवाड्याला भेट देतील. बडोद्याहून पंतप्रधान अमरेली येथे जाण्यासाठी रवाना होतील आणि दुपारी पावणेतीन वाजता ते अमरेलीमधील दुधाळा येथे भारत माता सरोवराचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते अमरेलीमध्ये लाठी येथे 4,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांची कोनशीला रचतील.
पंतप्रधानांची बडोदा भेट
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांच्यासह पंतप्रधान मोदी टाटा अॅडव्हांस्ड सिस्टिम्स मर्या. (टीएएसएल) या कंपनीच्या परिसरात सी-295 प्रकारच्या विमानांच्या उत्पादनासाठी उभारण्यात आलेल्या टाटा विमान संकुलाचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. सी-295 कार्यक्रमांतर्गत एकूण 56 विमानांचे नियोजन असून त्यापैकी 16 विमाने स्पेन येथून एअरबसने थेट वितरीत केली जाणार असून उर्वरित 40 विमाने भारतात तयार करण्यात येणार आहेत.
या 40 विमानांच्या निर्मितीची जबाबदारी टाटा अॅडव्हांस्ड सिस्टिम्स मर्या.या कंपनीवर सोपवण्यात आली आहे. ही सुविधा म्हणजे भारतात लष्करी विमाने तयार करणारी पहिलीच खासगी क्षेत्रातील अंतिम जुळवणी कार्ययंत्रणा असेल. यामध्ये उत्पादनापासून जुळवणीपर्यंत, चाचणी तसेच पात्रता ते वितरण आणि त्या विमानाच्या पूर्ण जीवनचक्र कालावधीतील देखभाल अशा संपूर्ण परिसंस्थेचा परिपूर्ण विकास समाविष्ट आहे.
टाटा समूहाखेरीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्या. आणि भारत डायनॅमिक्स मर्या. हे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आघाडीचे सार्वजनिक उपक्रम तसेच खासगी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधानांनी बडोदा अंतिम जुळवणी कार्ययंत्रणेची (एफएएल) कोनशीला रचली होती.
पंतप्रधानांनी अमरेली भेट
अमरेली मधील दुधाळा येथे निर्माण करण्यात आलेल्या भारत माता सरोवराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सरकारी-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत गुजरात राज्य सरकार आणि ढोलकिया फाउंडेशन यांच्या सहयोगातून सदर प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे. ढोलकिया फाउंडेशनने रोधी बांधामध्ये (चेक डॅम) सुधारणा केली आणि सुरुवातीला या धरणात 4.5 कोटी लिटर पाणी धारण करण्याची क्षमता होती पण ते खोल, रुंद आणि मजबूत केल्यानंतर त्याची क्षमता 24.5 कोटी लिटर पर्यंत वाढली आहे. या सुधारणेमुळे आजूबाजूच्या विहिरी तसेच कूपनलिकांमधील (बोअरवेल) पाण्याची पातळी वाढली असून त्याद्वारे अधिक चांगल्या सिंचनाची सोय झाल्याने स्थानिक गावांना तसेच शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
तेथे होणाऱ्या एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये अमरेली येथे 4,900 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच कोनशीला समारंभ होईल. गुजरात राज्यातील अमरेली, जामनगर, मोरबी, देवभूमी द्वारका, जुनागढ, पोरबंदर, कच्छ तसेच बोताड या जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे.
यावेळी पंतप्रधान 2,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि कोनशीला रचतील. राष्ट्रीय महामार्ग क्र,151, 151ए आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.51 यामधील विविध टप्पे तसेच जुनागढ बाह्यवळण रस्ता यांच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पांचे यावेळी उद्घाटन होईल. जामनगर जिल्ह्यातील ध्रोल बाह्यवळण ते मोरबी जिल्ह्यातील अमरन या दरम्यानच्या उर्वरित टप्प्याच्या चौपदरीकरण प्रकल्पाची कोनशीला देखील यावेळी रचण्यात येईल.
यावेळी पंतप्रधान सुमारे 1,100 कोटी रुपये खर्चासह पूर्ण करण्यात आलेल्या भूज-नलिया रेल्वे गॉज रुपांतर प्रकल्पाचे लोकार्पण करतील. या भव्य प्रकल्पामध्ये 24 प्रमुख पूल, 254 लहान पूल, 3 रस्ते उड्डाणपूल आणि 30 रस्त्याखालून जाणारे पूल यांचा समावेश असून हा प्रकल्प कच्छ जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक विकासामध्ये वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
या गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते अमरेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाच्या 700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच कोनशीला समारंभ होणार आहे. यामध्ये बोताड, अमरेली, जुनागढ, राजकोट आणि पोरबंदर या जिल्ह्यांमधील 36 शहरे तसेच 1,298 गावांमधील अंदाजे 67 लाख लाभार्थ्यांना 28 कोटी लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नावडा ते चावंड बल्क जलवाहिनी प्रकल्पाचा समावेश आहे. तसेच भावनगर जिल्ह्यातील महुआ, तळजा आणि पलीताणा या तालुक्यांमधील 95 गावांसाठी लाभदायक ठरणाऱ्या भावनगर जिल्ह्यातील पसावी गट संवर्धन पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची कोनशीला देखील रचण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पर्यटनाशी संबंधित विविध विकास उपक्रमांची देखील कोनशीला रचण्यात येईल. पोरबंदर जिल्ह्यातील मोकरसागर येथे असलेल्या कार्ली पुनर्भरण जलाशयाचे जागतिक दर्जाच्या शाश्वत पर्यावरण-स्नेही पर्यटन स्थळामध्ये रुपांतर करण्याच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे.
* * *
आशिष सांगळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178941)
Visitor Counter : 3
Read this release in:
Assamese
,
Bengali
,
English
,
Manipuri
,
Urdu
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam