सांस्कृतिक मंत्रालय
सार्वजनिक नोंदी हे सुशासन, पारदर्शकता आणि ऐतिहासिक सातत्य यांचा आधारस्तंभ: गजेंद्र सिंह शेखावत
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2025 5:18PM by PIB Mumbai
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारातर्फे (एनएआय) नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात सुरू असलेल्या सुशासन महिन्याचा भाग म्हणून "सुशासन और अभिलेख 2025" या शीर्षकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सुशासन आणि अभिलेखागार जतन यांच्यातील समन्वयाचा शोध घेण्यासाठी समर्पित एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची नांदी झाली. हे प्रदर्शन 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत जनतेसाठी खुले राहील.

उद्घाटनपर भाषणात, गजेंद्र सिंह शेखावत यांनी सुशासन, पारदर्शकता आणि ऐतिहासिक सातत्य यांचा आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक अभिलेखागारांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजमितीस 15 कोटीहून अधिक पृष्ठांचे डिजिटायझेशन करण्यात आले असल्याचे नमूद करून जगातील सर्वात मोठ्या डिजिटायझेशन प्रकल्पांपैकी एक राबविण्यात त्यांनी राष्ट्रीय अभिलेखागाराच्या अग्रगण्य प्रयत्नांची प्रशंसा केली.

या प्रदर्शनात दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण अभिलेखागारांच्या संग्रहाचे प्रदर्शन करण्यात आले आहे जे पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रभावी प्रशासनासाठी भारताच्या बांधिलकीवर प्रकाश टाकतात. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत जतन आणि संयोजन केलेल्या या नोंदींमधून प्रशासकीय कार्यक्षमता आणि त्याच्या माहितीपट वारशाचे जतन करण्याचा राष्ट्राचा संकल्प प्रतीत होतो. हे प्रदर्शन एनएआय च्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. संकेतस्थळ लिंक: https://nationalarchives.nic.in/sausaasana-aura-abhailaekha-2025.

2021 ते 2025 दरम्यान, 75,500 हून अधिक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे पुनरावलोकन करण्यात आले आणि ते भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारात हस्तांतरित करण्यात आले - देशाच्या अहवाल संकलन प्रणालीला बळकटी देण्यासाठी आणि महत्त्वाच्या सार्वजनिक माहितीचे दीर्घकालीन जतन सुनिश्चित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
महत्त्वाच्या प्रदर्शनांमध्ये खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले:
• भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (इव्हीएम) सादर करणे
• जनरल एस.एच.एफ.जे. माणेकशॉ यांची फील्ड मार्शल पदावर बढती
• पंचायती राज आणि विजय दिनानिमित्त गृह मंत्रालयाचे उपक्रम

प्रशासन, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय विकासात आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने विकासाला नवा आयाम देणारे दोन सर्वात आदरणीय नेते अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनाही या प्रदर्शनात आदरांजली वाहण्यात आली. या प्रदर्शनात संग्रहित छायाचित्रे आणि कागदपत्रांद्वारे, समावेशक विकास, युवा सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या चिरस्थायी वारशावर प्रकाश टाकण्यात आला.

***
गोपाळ चिप्पलकट्टी / वासंती जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177564)
आगंतुक पटल : 41