इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग आणि भारत टॅक्सी यांच्यात भागीदारी, सहकारी तत्त्वावर आधारित, नागरिक केंद्रित राष्ट्रीय  राइड-हेलिंग सेवेचा   डिसेंबर 2025 मध्ये होणार प्रारंभ

Posted On: 10 OCT 2025 4:47PM by PIB Mumbai

 

जागतिक स्तरावरील राइड-हेलिंग कंपन्यांच्या जगात भारत आता विश्वास, सर्वसमावेशकता आणि तंत्रज्ञानाने युक्त अशी आपली स्वतःची सेवा सुरु करत आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) भारत टॅक्सी हे ब्रँड नाव असलेल्या  सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड सोबत सल्लागार तत्त्वावर भागीदारी करणार असून हा  सहकार तत्त्वावर चालणारा एक अग्रगण्य  राष्ट्रीय राइड-हेलिंग उपक्रम आहे.

डिजिटल इंडिया सेवांशी जोडणी, सायबर सुरक्षा, गोपनीयता, अनुपालन आणि प्रशासन या क्षेत्रांमधील तांत्रिक सहकार्य आणि धोरणात्मक सल्लागार भागीदारीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाने सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार केला असून अधिकृत भागीदारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

भारत टॅक्सी हा उपक्रम राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, द इंडियन फार्मर्स फर्टिलायजर को-ऑपरेटीव्ह  (इफको), अमूल, कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळआणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ  या प्रमुख सहकारी आणि वित्तीय संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने राबवला जात आहे. हा उपक्रम सहकारी चळवळीच्या विचारधारेशी सुसंगत असून समावेशक, नागरिक केंद्रित आणि तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक सेवा वितरित करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या दृष्टिकोनाला अनुसरुन राबवला जात आहे.

राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग  भारत टॅक्सी प्लॅटफॉर्मसाठी खालील क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहे:

·  प्लॅटफॉर्म एकत्रीकरण आणि तंत्रज्ञान आरेखन : भारत टॅक्सी प्लॅटफॉर्मचे डिजिलॉकर, उमंग आणि ए पी आय सेतू यांसारख्या डिजिटल मंचांशी एकत्रीकरण करुन ओळख पडताळणी आणि सेवा वितरण सुलभ करणे.

· सुरक्षा, अनुपालन आणि पायाभूत सुविधा : भारत सरकारच्या डेटा संरक्षण तत्त्वांचे तसेच सायबर सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे  तसेच मजबूत तांत्रिक पायाभूत सुविधांबाबत सल्ला देणे

· कार्यक्रम सूचना  :  मोठ्या प्रमाणावरील राष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सची अंमलबजावणी करण्यातील राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाच्या  संस्थात्मक अनुभवाचा लाभ घेत प्रशासन आणि कार्यक्रम व्यवस्थापन पातळीवर सहाय्य करणे.

UI ( User Interface — वापरकर्ता इंटरफेस) /UX (User Experience — वापरकर्ता अनुभव) आणि प्रवेशयोग्यता  : सर्व नागरिकांसाठी समावेशक, बहुभाषिक आणि वापरकर्ता-अनुकूल अनुभव देण्यासाठी सूचना  देणे.

डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या भारत टॅक्सीच्या उद्घाटनासह   भारतातील वाहतूक व्यवस्था  मोठ्या परिवर्तनासाठी सज्ज आहे. या माध्यमातून सहकार चळवळीवर आधारित पारदर्शक आणि नागरिक-प्रथम दृष्टिकोन असलेला राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न आहे.

या भागीदारीतून भारताच्या डिजिटल प्रशासन उद्दिष्टांना चालना देणारा आणि नागरिकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर सक्षम करणारा सुरक्षित, परस्पर-सुसंगत आणि सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याची राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाची वचनबद्धता  दिसून येते.

***

सुषमा काणे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर


(Release ID: 2177495) Visitor Counter : 11