कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्षांची बार्बाडोसच्या राष्ट्रीय संसदेला भेट

Posted On: 10 OCT 2025 2:46PM by PIB Mumbai

 

बार्बाडोस इथे आयोजित 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या निमित्ताने, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाने बार्बाडोसच्या राष्ट्रीय संसदेला भेट दिली. यावेळी बार्बाडोसच्या हाऊस ऑफ असेंब्लीचे अध्यक्ष महामहिम आर्थर होल्डर यांनी बिर्ला आणि भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांचे उत्साहाने स्वागत केले. या भेटीदरम्यान, भारतीय प्रतिनिधी मंडळाचे  सदस्य आणि बार्बाडोसच्या खासदारांमध्ये परस्पर सहकार्य मजबूत करणे, लोकशाही मूल्यांचे आदानप्रदान करणे आणि जागतिक व्यासपीठांवर भागीदारी वाढवण्याच्या उद्देशाने चर्चा झाली.

भारत आणि बार्बाडोसच्या लोकशाही परंपरा, संसदीय प्रणाली आणि परस्पर सामायिक मूल्ये या दोन देशांना जवळ आणण्याचे काम करत असल्याची बाब यावेळी बिर्ला यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केली. हा ऐतिहासिक वारसा म्हणजे  भारत आणि बार्बाडोस मधील मैत्रीचे जिवंत उदाहरण असल्याचे ते म्हणाले. शिक्षण, संस्कृती, नवीकरणीय ऊर्जा आणि संसदीय सहकार्य या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी तपासून पाहण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाने दिलेल्या भेटीमुळे भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असल्यावरही दोन्ही देशांच्या खासदारांनी सहमती व्यक्त केली.

बार्बाडोसच्या या भेटीदरम्यान लोकसभे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही संवाद साधला.

तसेच या निमित्ताने, बिर्ला यांनी या परिषदेत सहभागी झालेल्या विविध देशांच्या संसदेच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेतल्या.

***

सुषमा काणे / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177343) Visitor Counter : 23