रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबई-अहमदाबाद अतिवेगवान बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अहमदाबादमधील महत्त्वाच्या बांधकाम स्थळांना दिली भेट



साबरमती आश्रमातील महात्मा गांधींच्या सुप्रसिद्ध चरख्यापासून प्रेरणा घेऊन साबरमती एचएसआर स्थानकाची रचना

बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो आणि बीआरटीएसच्या जाळ्यांमध्ये सुलभ परस्परजोडणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने साबरमती एचएसआर बहुपद्धतीय केंद्राची रचना

साबरमती एचएसआर डेपोमध्‍ये  रेल्वेच्या हलक्या आणि अवजड डब्यांच्या देखभालीसाठी 84 हेक्टर क्षेत्रामध्‍ये  जागतिक दर्जाची सुविधा

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2025 10:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 09 ऑक्टोबर 2025

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबई-अहमदाबाद अतिवेगवान रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पामधील अहमदाबाद येथे साबरमती परिसरातील महत्त्वाच्या बांधकाम स्थळांना भेट दिली. साबरमती अतिवेगवान रेल्वे (एचएसआर) स्थानक, एचएसआर बहुपद्धतीय वाहतूक केंद्र तसेच रोलिंग डेपो इत्यादी ठिकाणी सुरु असलेल्या कामांचा आढावा केंद्रीय मंत्र्यांनी घेतला.

साबरमती एचएसआर स्थानक: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेच्या एका बाजूच्या शेवटच्या टोकाच्या या स्थानकाची रचना साबरमती आश्रमातील महात्मा गांधीजींच्या चरख्यापासून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. हे स्थानक 45,000 वर्गमीटर क्षेत्रावर उभारण्यात येत आहे.

ट्रॅक फ्लोअरपर्यंतचे संरचनात्मक कार्य पूर्ण झाले असून अंतर्गत तसेच यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग (एमईपी) म्हणजेच यंत्रसंबंधित, विजेशी संबंधित आणि पाण्याच्या वाहिन्यांशी संबंधित कार्य प्रगतीपथावर आहे. या स्थानकामध्ये प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृहे, बालसंगोपन गृहे, किरकोळ आणि व्यावसायिक विक्रीची ठिकाणे इत्यादी जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा असतील आणि हे स्थानक विद्यमान रेल्वे, मेट्रो आणि बीआरटीएसच्या जाळ्याशी सुलभतेने जोडलेले असेल.

साबरमती एचएसआर बहुपद्धतीय केंद्र: अत्याधुनिक सुविधेच्या रुपात रचना करण्यात आलेले हे केंद्र एचएसआर स्थानक, साबरमती रेल्वे स्थानक, मेट्रो आणि बीआरटीएस यांच्या दरम्यान सुरळीत परस्पर जोडणी सुनिश्चित करणारे असेल.

साबरमतीच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करत स्थानकाच्या इमारतीच्या समोरील भिंतीवर दांडी यात्रेचे पोलादी चित्र लावण्यात येईल. या केंद्रात कार्यालयासाठी जागा, हॉटेलच्या सुविधा तसेच किरकोळ विक्रीची दुकाने आणि उपाहारगृहांसारख्या प्रवासी सुविधा यांचा समावेश असेल. या ठिकाणी 1,200 वाहने थांबवण्याची सोय असेल. या केंद्रात सौर पॅनेल्स, सुशोभित  टेरेस आणि उर्जा-कार्यक्षम प्रणालींसह विस्तृत हरित पायाभूत सुविधा देखील असतील.

साबरमती एचएसआर रोलिंग स्टॉक डेपो:  या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या तीन डेपोंपैकी हा सर्वात मोठा डेपो आहे. हे केंद्र एकूण 84 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले असून त्यामध्ये परीक्षण, स्टेबलिंग आणि कारखान्यांच्या सुविधेसह रेल्वे गाडी संचाच्या हलक्या तसेच अवजड प्रकारच्या देखभालीची सोय असेल.

प्रशासकीय इमारत, परीक्षण निवारे तसेच इतर सुविधा आणि रेल्वे मार्गासाठीच्या पायाभूत सुविधा यांचे बांधकाम वेगाने सुरु आहे. सदर डेपोच्या उभारणीत पर्यावरणीय शाश्वतता नियमांचे पालन केलेले असेल. या ठिकाणी पर्जन्य जल संधारण, सौर उर्जा विषयक तरतुदी तसेच शून्य द्रवरूप सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा यांची तरतूद केलेली असेल.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती: या एकूण 508 किमीच्या मार्गापैकी 325 किमीचे व्हायाडक्ट आणि 400 किमीचे पायर वर्क पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गात असणाऱ्या नद्यांवरील 17 पूल, 5 पीएससी पूल आणि 10 पोलादी पूल देखील बांधून पूर्ण झाले आहेत.

या प्रकल्पात एकूण 216 किमीचा ट्रॅक बेड टाकण्यात आला आहे तसेच या संपूर्ण मार्गालगत 4 लाखांहून अधिक ध्वनिरोधक बसवले गेले आहेत. या प्रकल्पातील गुजरात राज्यात असणाऱ्या स्थानकांचे काम प्रगत टप्प्यावर पोहोचले आहे. मुंबईतील भूमिगत टप्प्याच्या कामाची वेगवान प्रगती होत आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सदर प्रकल्पातील कार्याच्या गतीचे कौतुक केले आणि हा प्रकल्प नियोजित वेळी पूर्ण होण्याच्या दृष्टीने योग्य मार्गाने काम सुरु आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांबाबतच्या तसेच ‘2047 मधील विकसित भारत’ विषयीच्या दूरदृष्टीचे प्रतीक ठरतो आहे असे मत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केले..

***

सुवर्णा बेडेकर / संजना चिटणीस / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2177203) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati