सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-2025 चा तिसऱ्या पर्वाला आजपासून पणजी, गोवा येथे शानदार रंगतदार कार्यक्रमाने प्रारंभ
दिव्यांगांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल हा आगळ्या-वेगळ्या रूपात सादर होत असल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी केले कौतुक
Posted On:
09 OCT 2025 8:48PM by PIB Mumbai
पणजी, 9 ऑक्टोबर 2025
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-2025 चा तिसऱ्या पर्वाला आजपासून पणजी, गोवा येथे शानदार रंगतदार कार्यक्रमाने प्रारंभ झाला. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, राज्य दिव्यांग विभागाचे मंत्री श्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय दिव्यांग विभागाचे सचिव श्री राजेश अग्रवाल, राज्य दिव्यांग विभागाचे आयुक्त श्री गुरूप्रसाद पावसकर यांच्यासह संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील प्रतिनिधी श्री शोमबी शार्प उपस्थित होते.

दिव्यांगांना त्यांच्यात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल हा आगळ्या-वेगळ्या रूपात सादर होत असून यात विविध खेळांचा आणि स्पर्धाचा समावेश केल्याने सहभागी होणाऱ्याची वाढती संख्या ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी उदघाटन सत्रात बोलताना व्यक्त केले.

दिव्यांग कलाकारासह दिव्यांग खेळाडूना देखील अशाप्रकारच्या महोत्सवातून प्रेरित होण्याची संधी मिळत आहे. विकसित भारत निर्माण करण्यासाठी तसेच सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक स्तरावर पुढे जाण्यासाठी दिव्यांगाना सुद्धा सामावून घेणे आवश्यक आहे असे डॉ विरेन्द्र कुमार म्हणाले.

भारताच्या लौकिकात भर टाकण्याचे नेत्रदीपक क्षण गेल्या काही वर्षात दिव्यांग कलाकार आणि खेळाडूनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून दाखवून दिले आहे. गोव्यात साजरा होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट मधून प्रेरणा घेउन आता अनेक राज्यात असे महोत्सव होत आहेत अशी माहिती डॉ विरेन्द्र कुमार यांनी दिली.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या आयोजनासाठी गोवा सरकारचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात सामाजिक न्याय मंत्रालय समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्यरत असून दिव्यांगजनासाठी सुगम्य भारत योजना राष्ट्रीय स्तरावर कार्यान्वित केली असल्याचे श्री आठवले यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभात दिव्यांग कलावंतानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून महोत्सवाला सौंदर्य बहाल केले. 9 ते 12 ऑक्टोबर या चार दिवसांच्या महोत्सव कालावधीत गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिसरात विविध माहितीचे आणि दिव्यांगजणांसाठी लागणाऱ्या साहित्याचे स्टॉल तसेच प्रदर्शन लावण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या दिव्यांगजन विभागाने आयोजित केलेल्या या महोत्सवाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालाय व संयुक्त राष्ट्र संघाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
नाना मेश्राम/आशीष सांगळे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177066)
Visitor Counter : 38