माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या पुढच्या पिढीतील सर्जनशील प्रतिभा जोपासण्यासाठी आयआयसीटी, फिक्की आणि नेटफ्लिक्स दरम्यान ऐतिहासिक सामंजस्य करार


आयआयसीटी-फिक्की-नेटफ्लिक्स भागीदारीद्वारे भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर उद्योगाला चालना

Posted On: 07 OCT 2025 9:20PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्टोबर 2025

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) यांनी भारतातील एव्हीजीसी-एक्सआर (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी) प्रतिभा जोपासण्यासाठी नेटफ्लिक्स इंडियासोबत एक ऐतिहासिक भागीदारीची घोषणा केली. फिक्की फ्रेम्सच्या 25 व्या पर्वात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला.

या सहकार्यामुळे भारतातील सर्जनशील तंत्रज्ञान व्यावसायिकांची पुढील पिढी तयार करण्यासाठी आयआयसीटी च्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमता, फिक्की चे विस्तृत उद्योग नेटवर्क आणि नेटफ्लिक्सच्या सर्जनशील कौशल्याचा लाभ घेतला जाईल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आयआयसीटी उद्योग-चालित अभ्यासक्रम विकसित करेल, तर विद्यार्थ्यांना आघाडीच्या व्यावसायिकांच्या कार्यशाळा, मास्टरक्लास आणि अतिथींच्या व्याख्यानांचा फायदा होईल. या भागीदारीमुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कमी प्रतिनिधित्व असलेल्या प्रतिभेला पाठबळ देण्यासाठी नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटीद्वारे निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील प्रदान केली जाईल. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्स आयआयसीटीच्या राष्ट्रीय परिषदांमध्ये - संशोधन आणि विकास परिषद, शैक्षणिक परिषद आणि उद्योग विकास परिषद - सहभागी होईल आणि भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करेल.

या कार्यक्रमात सुरुवातीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितले की, भारतीय माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र आता कल्पना, तंत्रज्ञान आणि तरुणाईची उर्जा यांच्या सामर्थ्यासह जागतिक प्रगतीच्या कड्यावर उभे आहे. उद्योगांना निर्भयपणे नवोन्मेष घडवून आणण्याचे आणि उभारी देण्याऱ्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना भारतीय सर्जनशीलतेच्या आश्वासकतेवर विश्वास ठेवण्याचे आणि कलाकारांना देशाच्या सांस्कृतिक प्रारूपाला धैर्याने आणि विवेकाने आकार देणे सुरु ठेवण्याचे आवाहन करत संजय जाजू यांनी या क्षेत्राला शाश्वत आणि समावेशक सर्जक भविष्यासाठी एकत्रितरीत्या काम करण्याचा आग्रह केला.

आयआयसीटीचे सीईओ डॉ.विश्वास देऊस्कर म्हणाले, “हा सहयोग शिक्षण क्षेत्र आणि उद्योग यांना एकमेकांशी सांधून देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, मार्गदर्शन आणि जगातील सर्वोत्तम पद्धतींचा अनुभव देईल.” फिक्की एव्हीजीसी-एक्सआर मंचाचे अध्यक्ष मुंजाल श्रॉफ पुढे म्हणाले, “हा सामंजस्य करार प्रतिभेची जोपासना करणाऱ्या, नवोन्मेषाला चालना देणाऱ्या आणि शाश्वत विकासाची जोपासना करणाऱ्या उद्योग-चलित परिसंस्था निर्माण करून भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्राला बळकट करेल.”

नेटफ्लिक्स इंडियाच्या जागतिक व्यवहार विभागाच्या संचालक महिमा कौल म्हणाल्या, “हा सहयोगी संबंध भारताच्या एव्हीजीसी क्षेत्राला मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अनुसरून आहे आणि तो विद्यार्थ्यांना कौशल्ये, मार्गदर्शन आणि मनोरंजन क्षेत्रात नवोन्मेषाला प्रेरणा देण्याच्या संधी यांसह सक्षम करतो”.

या भागीदारीतून भारताची सर्जक अर्थव्यवस्था आणि डिजिटल कार्यक्रमांची परिसंस्था बळकट करणे, विद्यार्थ्यांना एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रात जागतिक पातळीवर स्पर्धेत उतरण्यासाठी कौशल्ये, मार्गदर्शन आणि संधी मिळण्याची सुनिश्चिती करणे यावर देशाने एकाग्र केलेले लक्ष प्रतिबिंबित होते.

 

सुषमा काणे/वासंती जोशी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2176049) Visitor Counter : 12