सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींचे आधुनिक अपंगत्व पुनर्वसनाशी एकत्रीकरण
Posted On:
06 OCT 2025 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2025
आधुनिक अपंगत्व पुनर्वसनाशी पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींची सांगड घालण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने आयुष मंत्रालयासोबत सहकार्यात्मक संशोधन प्रकल्पांच्या मालिकेला मंजुरी दिली आहे. हे उपक्रम न्यूरोडायव्हर्सिटी, रक्त विकार, श्रवणदोष, शारीरिक अपंगत्व आणि वयाशी निगडित परिस्थिती असलेल्या दिव्यांगजनांचे जीवनमान उंचावण्यासाठी आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
राष्ट्रीय दिव्यांगजन निधीच्या 19 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत, दिव्यांगजन विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली. समग्र आणि पुराव्यावर आधारित दृष्टिकोनांवर भर देऊन, संशोधनातील तफावत भरून काढणे, एकात्मिक उपचारांना प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण भारतातील दिव्यांगजनांसाठी समावेशक निरामयतेला चालना देणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.
मंजूर प्रकल्पांची ठळक वैशिष्ट्ये:
- सिकंदराबाद येथील NIEPID येथे न्यूरोडायव्हर्सिटीमधील संशोधन केंद्राची स्थापना: आंतरविद्याशाखीय संशोधन आणि क्षमता बांधणीद्वारे बौद्धिक अपंगत्व, ऑटिझम, ADHD आणि संबंधित परिस्थिती असलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी पारंपारिक प्रणालींचा शोध घेणे.
- ओदिशा येथील SVNIRTAR येथे रक्त विकारांच्या पुनर्वसनासाठी सहकार्य: थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकलसेल अॅनिमियासाठी "रक्तामृत वटी " सारख्या आयुर्वेदिक हस्तक्षेपांचे एकत्रीकरण.
- AYJNISHD, मुंबई येथे निरामयतेवर योगाचा परिणाम: बहिरेपणा असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना योगाचे फायदे समजावून सांगणे.
- PDUNIPPD, नवी दिल्ली येथे वृद्धांसाठी योगासह ऑक्युपेशनल थेरपी: शारीरिक, संज्ञानात्मक आणि कार्यात्मक परिणामांवर एकत्रित प्रभावांचा अभ्यास करणे.
- PDUNIPPD, नवी दिल्ली येथे गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिससाठी आयुर्वेद आणि पंचकर्म: फिजिओथेरपी उपायांशी आयुर्वेदिक प्रक्रियांची तुलना करणे.
- नवी दिल्लीतील पीडीयूएनआयपीपीडी येथे सेरेब्रल पाल्सीसाठी आयुर्वेद, ओटी आणि व्हीआर: मुलांमधील सकल मोटर फंक्शन्सवरील परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे.
- नवी दिल्लीतील पीडीयूएनआयपीपीडी येथे डायबेटिक अधेसिव्ह कॅप्सुलीटीससाठी आयुर्वेदिक हर्बल उपचार विरुद्ध इन्सुलिन: मधुमेही रुग्णांमध्ये फिजिओथेरपीच्या परिणामांचे मूल्यांकन करणे.
एनआयईपीआयडी (सिकंदराबाद), एसव्हीएनआयआरटीएआर (ओडिशा), एवायजेएनआयएसएचडी (मुंबई) आणि पीडीयूएनआयपीपीडी (नवी दिल्ली) यासारख्या प्रमुख राष्ट्रीय संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पांसाठी राष्ट्रीय निधी अंतर्गत एकूण 5.26 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175603)
Visitor Counter : 10