विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताची सध्याची सुमारे 27.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्यांची औषध निर्यात या वर्षाच्या अखेरीस 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा - डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
30 SEP 2025 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
भारताची औषध निर्यात, जी सध्या सुमारे 27.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, ती या वर्षाच्या अखेरीस 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
दरम्यान, मंत्र्यांनी सांगितले की भारताची देशांतर्गत औषध बाजारपेठ 60 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, जी 2030 पर्यंत आताच्या दुप्पट म्हणजेच सुमारे 130 अब्ज अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यातील अधिकृत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सिंह बोलत होते.

सध्या देशात सुमारे 800 वैद्यकीय उपकरण उत्पादक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारताची वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील वार्षिक वाढ 15 ते 20% आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
भारतातील जैवतंत्रज्ञान प्रणालीच्या झपाट्याने झालेल्या विस्ताराबद्दल बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की 2014 मध्ये देशात सुमारे 50 स्टार्टअप्स होते, त्यांची संख्या आज 11,000 हून अधिक झाली आहे. हे या क्षेत्राच्या क्षमतेचे दर्शक आहे तसेच यामुळे देशाच्या आर्थिक आणि आरोग्यसेवा उद्दिष्टांना चालना मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. भारत आता लसींचा जागतिक पुरवठादार म्हणून ओळखला जातो, कारण जगातील 60 टक्क्यांहून अधिक लसी भारतात उत्पादित केल्या जातात आणि 200 हून अधिक देशांना भारतीय लसींच्या मात्रा पुरवल्या जातात, असे ते म्हणाले.

या वाढीचे श्रेय त्यांनी धोरणात्मक सहाय्य आणि ‘समन्वित शासकीय दृष्टिकोन’ यांना दिले, ज्या अंतर्गत डीबीटी आणि त्याच्या संस्था राज्यांशी भागिदारी निर्माण करण्यासाठी सतत संपर्क साधत आहेत, असे ते म्हणाले. नवीन डीबीटी-यूपी करारासारख्या भागीदारीमुळे “विकसित भारत 2047” या दृष्टिकोनाला पुढे नेण्यास मदत होईल आणि "मेड इन इंडिया मेड फॉर द वर्ल्ड" या ध्येयानुसार परवडणारी आरोग्यसेवा उपाय प्रदाता म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.

* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173374)
Visitor Counter : 5