कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीने इटलीत, रोम इथे आयोजित जागतिक परिषदेत केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी दुग्ध आणि पशुधन क्षेत्रातील भारताचे ठळक उपक्रम केले अधोरेखित

Posted On: 29 SEP 2025 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी इटलीत, रोम इथे अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीने आयोजित शाश्वत पशुधन परिवर्तन या विषयावरच्या दुसऱ्या जागतिक परिषदेला संबोधित केले. या परिषदेअंतर्गत झालेल्या उच्चस्तरीय मंत्री स्तरावरील सत्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. आपल्या संबोधनातून त्यांनी भारतातील शेतकरी केंद्रित उपक्रम, कृषी क्षेत्राशी संबंधीत नवोन्मेष आणि या क्षेत्रातील परिवर्तनकारी बदलांबाबतची माहिती दिली. याअंतर्गतच्या व्यापक उपाययोजनांमुळे देशातील पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राची सर्वसमावेशक प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारताने अन्न सुरक्षा सुनिश्चिततेसाठी, पोषणविषयक परिणामकारतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी, उपजीविकेला बळकटी देण्यासाठी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक परिवर्तनकारी आणि समावेशक उपक्रम हाती घेतले असल्याचे ते म्हणाले.

अलिकडच्या काळात देशात पशुधन क्षेत्रात 12.77% इतक्या वार्षिक चक्रवाढ दराने वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे देशाच्या कृषी क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनात या क्षेत्राचा वाटा 31% तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत 5.5% इतका होता असे त्यांनी सांगितले. भारत आज जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक असून, भारतात वार्षिक 239 दशलक्ष टन म्हणजेच जागतिक उत्पादनाच्या तुलनेत जवळपास 25% दुग्धोत्पादन भारतात होते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. भारत हा अंड्यांच्या बाबतीतही दुसरा सर्वात मोठा उत्पादक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भारताच्या पशुधन क्षेत्रातील प्रगतीचे श्रेय हे लोक केंद्रित धोरणे, जागतिक पातळीवरील परस्पर सहकार्य आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांनी कायम दाखवलेल्या लवचिकतेचे आहे असे ते म्हणाले. अन्न आणि कृषी संघटनेसोबतच्या भारताच्या 80 वर्षांच्या भागीदारीबाबत तसेच ग्लोबल साउथ अंतर्गत येणाऱ्या देशांसोबत विस्तार करता येण्याजोगे नवोन्मेष सामायिक करण्याप्रति भारताची वचनबद्धताही त्यांनी पुन्हा व्यक्त केली.

शाश्वत पशुधन परिवर्तनासाठी असलेली जागतिक कृती योजना ही एक मार्गदर्शक आराखडा म्हणून कायम राहिली पाहिजे, तिचे स्वरूप आदेशात्मक  असता कामा नये, असे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी स्पष्ट केले. विकसनशील देशांचे राष्ट्रीय प्राधान्यक्रम, क्षमता आणि परिस्थिती यांना या योजनेत पुरेपूर वाव मिळायला हवा, यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रातल्या बदलांना टप्प्याटप्प्याने पाठिंबा देण्यासाठी त्यांनी वित्तपुरवठा, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता बांधणीसाठी जागतिक स्तरावर आवाहन केले. भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, केंद्रीय मंत्र्यांनी पशुधन क्षेत्र अधिक शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

रोम इथल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या परिषदेत बोलताना राजीव रंजन सिंह यांनी भारताने पशुधन क्षेत्रात उचललेल्या प्रमुख पावलांवर प्रकाश टाकला.

भारताने पशुधन क्षेत्रात राबवलेले प्रमुख उपक्रम:

  • राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या माध्यमातून भारत देशी गोवंश जातींचे संवर्धन करत असून अनुवांशिक विविधता सुधारत आहे. या योजनेचा आतापर्यंत 9.2 कोटींहून अधिक जनावरांना फायदा झाला असून, देशातील 5.6 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
  • भारत जगातला सर्वात मोठा पशुधन लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे.
  • राष्ट्रीय डिजिटल पशुधन मिशन- भारत पशुधन या अंतर्गत, भारताने जनावरांची डिजिटल ओळख प्रणाली तयार केली आहे. यामुळे जनावरांचा मागोवा घेणे, रोगांचे लवकर निदान करणे आणि प्राणीजन्य उत्पादनांच्या सुरक्षिततेची खातरजमा करणे शक्य झाले आहे. आजपर्यंत 35.3 कोटींपेक्षा जास्त जनावरांची आणि 9.4 कोटी पशुपालकांची नोंदणी झाली आहे.
  • भारत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी कटिबद्ध आहे. देशात दुग्धव्यवसाय क्षेत्रात 70% पेक्षा जास्त मनुष्यबळ महिलांचे आहे.
  • भारत आणि आयर्लंड यांनी संयुक्तपणे 'आंतरराष्ट्रीय दूध दिवसा'साठीच्या ठरावाला सह-प्रायोजित केले आहे. या ठरावाला 44 व्या अन्न आणि कृषी संघटनेच्या परिषदेने मान्यता दिली असून, आता तो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत विचारात घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172922) Visitor Counter : 8
Read this release in: English