वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय निर्यातदारांना विकासासाठी 'भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारा'चा लाभ घेण्याचे आवाहन;लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना नव्या बाजारपेठांचा लाभ घेण्याचे आवाहन
द्विपक्षीय व्यापारातील मैलाचा दगड ठरलेल्या करारावर परदेश व्यापार महासंचालनालयाच्या चर्चासत्रात उद्योग क्षेत्राचा सहभाग
Posted On:
29 SEP 2025 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या परदेश व्यापार महासंचालनालयाच्या प्रादेशिक प्राधिकरणातर्फे, नुकत्याच झालेल्या भारत- ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर आधारित एक चर्चासत्र आयोजित केले होते. हे चर्चासत्र नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथे संपन्न झाले.
"विकासाचे महाद्वार : भारत – ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारा अंतर्गत संधींचा लाभ" या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकारी, परदेशी प्रतिनिधी, निर्यात प्रोत्साहन परिषदांचे प्रतिनिधी, अग्रगण्य उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी भाग घेतला. भारतीय निर्यातदारांसाठी या करारातून निर्माण होणाऱ्या परिवर्तनकारी क्षमतेवर चर्चा करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले परदेशी व्यापार महासंचालक आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय भादू यांनी ब्रिटनच्या बाजारपेठेत भारताचा ठसा वाढवण्यासाठी या सर्वसमावेशक कराराचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी शुल्कातल्या सवलती, बाजारपेठेत प्रवेशासाठीच्या सुलभ तरतुदी आणि भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जागतिक मूल्य शृंखलांमध्ये अधिक दृढतेने एकत्र येण्याची संधी यावर प्रकाश टाकला.
वाणिज्य विभागाचे सहसचिव साकेत कुमार यांनी या वाटाघाटींची पार्श्वभूमी आणि धोरणात्मक संदर्भ स्पष्ट केला. भारतीय उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या बांधिलकीवर त्यांनी भर दिला.
यावेळी ब्रिटन सरकारच्या वतीने ब्रिटिश उच्चायुक्ताच्या दक्षिण आशिया विभागाच्या व्यापार उप आयुक्त ॲना शॉटबोल्ट यांनी या कराराचे वर्णन "द्विपक्षीय व्यापार संबंधांमधला एक मैलाचा दगड" असे केले. ब्रिटनच्या प्रमुख विभागातील बाजारपेठा काबीज करण्यासाठी भारतीय निर्यातदारांनी शाश्वतता आणि गुणवत्ता या मानकांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्ताच्या मंत्री (आर्थिक) निधी मणी त्रिपाठी यांनी ब्रिटनमध्ये भारतीय व्यवसायांसाठी, विशेषतः अन्न, वस्त्रोद्योग आणि सेवा या क्षेत्रांमध्ये उदयाला येत असलेल्या संधींविषयी व्यावहारिक माहिती दिली.
या कार्यक्रमात भारताच्या प्रमुख निर्यात प्रोत्साहन परिषदांच्या सक्रिय सहभागातून क्षेत्रीय दृष्टिकोनावर विशेष भर देण्यात आला. उत्पादन आणि सर्जनशील क्षेत्रातील निर्यात प्रोत्साहन परिषदांच्या नेत्यांनी आपापल्या उद्योगांच्या सामर्थ्याकडे लक्ष वेधले.
बाईंग एजन्टस् असोसिएशनच्या सरचिटणीस आँचल कन्सुल यांनी या चर्चेत महत्वाचे मुद्दे मांडले. ब्रिटनच्या खरेदीदारांसोबत विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि वेळेवर वितरण यावर त्यांनी भर दिला. ब्रिटन इंडिया बिझनेस कौन्सिल आणि एचएसबीसीनेसुद्धा उद्योग सहकार्य वाढवणे आणि भारत- ब्रिटन व्यापार अधिक मजबूत करण्यासाठी लवचिक पुरवठा साखळी तयार करण्याविषयी आपले मत व्यक्त केले.
निर्यातदारांसोबतच्या झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172911)
Visitor Counter : 2