वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेने वतीने वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटी कार्यक्रमाचा प्रारंभ

Posted On: 29 SEP 2025 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2025

 

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेने वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांसाठीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटी कार्यक्रमाचा आज प्रारंभ केला. भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेच्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटी केंद्राच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सरकारी अधिकाऱ्यांचे वाटाघाटी कौशल्य अधिक बळकट करण्यासाठी तसेच भारताचा जागतिक व्यापारातल्या सहभागाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आखला गेला आहे.

वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल हे या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थात्मक क्षमता बांधणीचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंधित क्षेत्रांतील तज्ञांनी दिलेले सर्व संबंधित विषय एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाटाघाटींमध्ये कायम महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले, तसेच या अभिनव शिक्षण उपक्रमात सहभागी झालेल्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेचे कुलगुरू प्राध्यापक राकेश मोहन जोशी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे आजवरचे यश मांडले. सद्यस्थितीत भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था लिंक्डइन आणि राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखड्यात आघाडीवर असलेली संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरीसाठीच्या वेतनाचे पॅकेज 1.23 कोटी रुपये पर्यंत पोहोचले असल्याचेही त्यांनी सांगितले. अलिकडेच काकीनाडा आणि गिफ्ट सिटी इथेही संस्थेच्या शाखा सुरू झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. दुबई इथेही संस्थेची शाखा सुरू करण्याचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला वाणिज्य तसेच शिक्षण आणि गृह व्यवहार मंत्रालयांची, विद्यापीठ अनुदान आयोगाची आणि दुबई सरकारची मंजुरी मिळाली असल्याने ही शाखा लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. यासोबतच, संस्थेच्या वतीने द्विपक्षीय व्यापार आणि मुक्त व्यापार करारांवरील 30 अभ्यास प्रकल्प तयार केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार तसेच व्यापक आर्थिक आणि व्यापार करारातून भारत व्यापारविषयक गुंतागुंतीच्या परिस्थितीतही कशा रितीने यशस्वीरित्या मार्ग काढू शकतो याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम म्हणजे वाणिज्य सचिवांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब असल्याचे या कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक रोहित मेहतानी (आंतरराष्ट्रीय वाटाघाटी केंद्र आणि व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे प्रमुख) यांनी सांगितले. यासोबतच या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटी सारख्या जटिल क्षेत्रासाठी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये क्षमता निर्माण करण्याप्रति भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेची सातत्यपूर्ण वचनबद्धताही अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना बहुपक्षीय आणि द्विपक्षीय मंचांवर अधिक प्रभावीपणे वाटाघाटी करण्याकरता व्यावहारिक मुद्यांचे आणि त्या अमलात आणण्याच्या योग्य पद्धतींचे ज्ञान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा उपक्रमातून व्यापाराशी संबंधित प्रशिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक पाठबळ उपलब्ध करून देण्यासंबंधीची भारताची आघाडीची संस्था म्हणून भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था सातत्यपूर्णतेने बजावत असलेली भूमिकाही ठळकपणे अधोरेखित झाली.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172882) Visitor Counter : 12
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil