खाण मंत्रालय
आयएनएसएचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आयआयएसईआर पुणे चे अभ्यागत प्राध्यापक, प्रा. श्याम सुंदर राय यांचा राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार 2024 ने झाला सन्मान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 20 प्रख्यात भूवैज्ञानिकांचा तीन श्रेणींमध्ये 12 पुरस्कारांनी सन्मान
Posted On:
26 SEP 2025 4:13PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 सप्टेंबर 2025) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात भूविज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जाणारे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार-2024 प्रदान केले.या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी, खाण मंत्रालयाचे सचिव पीयूष गोयल, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे महासंचालक असित साहा, यांच्यासह इतर उच्चपदस्थ अधिकारी आणि मान्यवर अतिथी उपस्थित होते.
यंदा, 20 प्रख्यात भूवैज्ञानिकांना तीन श्रेणींमध्ये 12 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार (01 पुरस्कार), राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार (01 पुरस्कार), आणि राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार (भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये 10 पुरस्कार), या पुरस्कारांचा समावेश आहे.
राष्ट्रीय भूविज्ञान जीवनगौरव पुरस्कार 2024 आयएनएसएचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आयआयएसईआर पुणे चे अभ्यागत प्राध्यापक, प्रा. श्याम सुंदर राय यांना प्रदान करण्यात आला. द्वीपकल्पीय भारत, पश्चिम हिमालय आणि लडाखमधील पथदर्शी भूकंपशास्त्रीय संशोधनासह, भूगर्भ आणि संशोधनात्मक भूभौतिकशास्त्रामधील त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आले.
सुपरकॉन्टिनेंट असेंब्ली आणि खनिजांच्या उत्पत्तीचे ज्ञान वाढवणाऱ्या मेघालय आणि झारखंड, बुंदेलखंड क्रेटन या ठिकाणच्या भूगर्भीय उत्क्रांतीवरील उल्लेखनीय कामाबद्दल, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ सुशोभन नेओगी यांना राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या खाण मंत्रालयाने 1966 मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांद्वारे, खनिज शोध आणि उत्खनन, मुलभूत/उपयोजित भूविज्ञान, खाण आणि संबंधित क्षेत्र, यासारख्या भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रात असाधारण कामगिरी आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि गटांचा गौरव केला जातो.
कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, खनिजांनी मानवी संस्कृतीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. पृथ्वीच्या कवचात आढळणाऱ्या खनिजांनी मानवी जीवनाचा पाया रचला, आणि आपल्या व्यापार आणि उद्योगाला आकार दिला. अश्मयुग, कांस्य युग आणि लोहयुग, हे मानवी संस्कृतीच्या विकासाचे प्रमुख टप्पे खनिजांच्या नावावर आधारित आहेत. लोखंड आणि कोळसा यांसारख्या खनिजांशिवाय औद्योगिकीकरणाची कल्पनाही करता आली नसती.
राष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, आपला देश तीन बाजूंनी महासागरांनी वेढलेला आहे. या महासागरांच्या पोटामध्ये खोलवर अनेक मौल्यवान खनिजांचा साठा आहे. राष्ट्राच्या विकासासाठी या संसाधनांचा वापर करण्यात भू-शास्त्रज्ञांची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्राच्या फायद्यासाठी समुद्राच्या तळाखालील संसाधनांचा वापर करता येईल आणि सागरी जैवविविधतेचे नुकसान कमी होईल, अशा तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, भू-वैज्ञानिकांची भूमिका केवळ खाणकामपुरती मर्यादित नाही. भू-पर्यावरणीय शाश्वततेवर खाणकामाचा परिणाम देखील त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. खनिज उत्पादनांमध्ये मूल्य वाढविण्यासाठी आणि अपव्यय कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करून ते वापरण्याची आवश्यकता आहे. शाश्वत खनिज विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. खाण मंत्रालय शाश्वतता आणि नवोपक्रमासाठी वचनबद्ध आहे आणि खाण उद्योगात एआय, मशीन लर्निंग आणि ड्रोन-आधारित सर्वेक्षणांना प्रोत्साहन देत आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला आनंद झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले आणि खाणींमधून मौल्यवान घटकांच्या पुनर्प्राप्तीसाठी मंत्रालयाने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, दुर्मिळ भू-खनिजे घटक (आरईई) हे आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा आहेत. त्यांचा उपयोग स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक वाहनांपासून ते संरक्षण प्रणाली आणि स्वच्छ ऊर्जा उपाय अशा सर्व गोष्टींना वीज पुरवताना केला जातो. सध्याची भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता, भारताने त्यांच्या उत्पादनात स्वावलंबी होणे आवश्यक आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेची खात्री करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधोरेखित केले की, आरईई दुर्मिळ आहेत, म्हणूनच ते फक्त दुर्मिळ मानले जात नाहीत, तर त्यांना शुद्ध करण्याची आणि वापरण्यायोग्य बनवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच या प्रक्रियेसाठी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे हे राष्ट्रीय हितासाठी एक मोठे योगदान असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
***
शैलेश पाटील / राजश्री आगाशे / सुवर्णा बेडेकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171986)
Visitor Counter : 15