सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
संख्याशास्त्र संस्थांच्या 29 व्या परिषदेत प्रमुख डिजिटल रुपांतरण उत्पादनांचे सादरीकरण
Posted On:
26 SEP 2025 11:48AM by PIB Mumbai
संख्याशास्त्र व उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) आज केंद्र व राज्य संख्याशास्त्रीय संस्थांच्या 29व्या परिषदेत प्रमुख डिजिटल उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रमाणित, सुलभ आणि कृत्रिम बुद्धीमत्ता वापरासाठी सज्ज अशा बदलांचे सादरीकरण प्रामुख्याने करण्यात आले. मंत्रालयाचे पुनर्रचित संकेतस्थळ, राष्ट्रीय मेटाडेटा रचना (NMDS) पोर्टल, पैमाना (PAIMANA) पोर्टल आणि प्रशासकीय संख्याशास्त्रामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता वापराची उदाहरणे डिजिटल रुपांतरणाचे आधारस्तंभ म्हणून सादर करण्यात आली.
MoSPI संकेतस्थळ (2.0) – संख्याशास्त्राचे आधुनिक प्रवेशद्वार
mospi.gov.in हे भारताच्या अधिकृत सांख्यिकीचे पुनर्रचित संकेतस्थळ सोपे, सुरक्षित आणि वापरकर्त्यासाठी सुलभ आहे. सूचक मार्गदर्शन, आधुनिक शोध साधने, कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित बहुभाषिक चॅटबोट आणि क्लाउड फर्स्ट रचना याद्वारे या संकेतस्थळावरुन संख्याशास्त्रीय स्रोत सुरळीतपणे मिळवता येण्याची हमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल ब्रँड मानकांनुसार तयार करण्यात आलेले हे संकेतस्थळ विश्वासार्हता वाढवण्यासोबतच जगातील सर्वोत्कृष्ट संकेतस्थळांशी साधर्म्य राखते. परिणामी धोरणकर्ते, संशोधक व नागरिकांना त्वरित व सोप्या रितीने माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
केंद्र सरकारचे सांख्यिकी ऍप GoIStats app ((ioS version)
याप्रसंगी GoIStats ऍपदेखील आयफोनच्या प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आले. संख्याशास्त्र दिनानिमित्त या वर्षाच्या प्रारंभी एँड्रॉइड प्रणालीसाठीचे ऍप सुरू करण्यात आले होते. केवळ तीन महिन्यांत 10,000 पेक्षा जास्त मोबाइलधारकांनी याचा वापर सुरू केला.
पैमाना PAIMANA पोर्टल
मंत्रालयाचा पायाभूत सुविधा व प्रकल्प विभाग पायाभूत सुविधांच्या विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पायाभूत सुविधांमधल्या सर्वोत्कृष्टतेच्या आपल्या वचबद्धतेला अनुसरुन मंत्रालयाने पैमाना म्हणजेच प्रकल्प मूल्यांकन सुविधा देखरेख आणि विश्लेषण PAIMANA हे एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असलेले पोर्टल सुरू केले आहे. पूर्वीच्या ऑनलाइन संगणकीय नियंत्रक प्रणालीची जागा या पोर्टलने घेतली आहे. https://ipm.mospi.gov.in या संकेलस्थळावरुन या पोर्टलवर जाता येते. या नव्या पोर्टलवरुन रस्ते, रेल्वे, पेट्रोल, नगर विकास, कोळसा, जहाज बांधणी, नागरी हवाई वाहतूक अशा सर्व प्रमुख क्षेत्रांमधील 150 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचेही सुलभपणे नियंत्रण करणे शक्य आहे. पैमाना हा समृद्ध माहिती विश्लेषण, परिणामानुसार मिळणारे स्वयंचलित अहवाल आणि उच्चस्तरीय देखरेखीसाठी आवश्यक बदल करता येतील अशी रचना केलेले डॅशबोर्ड या सुविधा असलेला आधुनिक डिजिटल मंच आहे. हे एक मोबाईल ऍप असल्यामुळे पायाभूत सुविधांबाबतची माहिती कधीही कुठेही उपलब्ध होऊ शकते. योग्य आणि वेगाने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला यामुळे चालना मिळाली आहे.
एनएमडीएस पोर्टल – उत्तम प्रशासनासाठी मेटाडेटाचे प्रमाणीकरण
nmds.mospi.gov.in हा राष्ट्रीय मेटाडेटा रचना (एनएमडीएस) पोर्टल डेटा प्रशासनातील एक प्रमुख टप्पा आहे. डेटा तयार होणाऱ्या सर्व संस्थांचा प्रमाणित मेटाडेटा साठविण्यासाठी एक केंद्रिय सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. केंद्रीकृत साठा, मागील माहिती तपासण्यासह आवृत्ती नियंत्रण, आधुनिक फिल्टर व एक्सपोर्ट पर्याय, एकाच वेळी अनेक प्रणाली वापरण्याची गतीमान सुविधा आणि दर्जा कायम राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना आराखडा या आधुनिक सुविधांमुळे या पोर्टलवरुन मेटाडेटा व्यवस्थापन विश्वासार्ह व एकसमान होण्याची खात्री मिळते. देशव्यापी मेटाडेटा मानके निश्चित केल्यामुळे कार्यक्षमता सुधारते, सांख्यिकी प्रणालींमधले सातत्य सुधारते आणि कृत्रिम बुद्धीमत्ता वापरासाठी सज्ज, मशिनला हाताळता येईल असे डेटासेटस तयार करण्याचा पाया उभारला जातो.
प्रशासकीय सांख्यिकीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता – भविष्यकाळासाठी सज्ज ऍप्लिकेशन
मंत्रालयाने कृत्रिम बुद्धीमत्तेचा संख्याशास्त्रीय प्रक्रियेतील उपयोग दर्शविणाऱ्या आपल्या ऍपच्या प्राथमिक आवृत्तींचे सादरीकरण यावेळी केले. यातून विकसित भारत 2047 साठी उच्च दर्जाची संख्याशास्त्रीय माहिती मिळविण्यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता प्रशासकीय सांख्यिकीमध्ये सुधारणा करुन गतीमानता कशी आणू शकते याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. रचनात्मक कृत्रिम बुद्धीमत्ता / मशिन लर्निंग आराखड्यानुसार, मंत्रालय आपल्या सांख्यिकी प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करत आहे. मंत्रालयाच्या माहिती नवोन्मेष प्रयोगशाळा आणि संशोधन व विश्लेषण विभागाच्या सहाय्याने माहिती संकलन, प्रक्रिया आणि प्रसार यामधील प्राथमिक प्रयोग केले जात आहेत. या उपक्रमांमुळे माहितीचा दर्जा सुधारणे, वेगवान प्रक्रिया व पुढचा अंदाज देणारे परिणाम यांना चालना मिळत असून त्यांचा नियोजन व धोरण आखण्यामध्ये फायदा होत आहे.
डिजिटल व कृत्रिम बुद्धीमत्ता सुसज्ज सांख्यिकी प्रणालीकडे वाटचाल
पुनर्रचित संकेतस्थळ, पोर्टल्स आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केलेली ऍप्लिकेशन्स यांनी एकत्रितरित्या पारदर्शी कारभार, प्रमाणित माहिती आणि आधुनिक विश्लेषण क्षमता यासाठी मजबूत पाया रचला आहे. सध्याच्या डिजिटल युगात भारताची संख्याशास्त्रीय परिसंस्था मजबूत करुन पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मिती सक्षम करण्याप्रतीची मंत्रालयाची वचनबद्धता या उपक्रमांमधून पुन्हा निर्धारित होते.
***
शिल्पा पोफळे / सुरेखा जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171681)
Visitor Counter : 7