संरक्षण मंत्रालय
सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांकडून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत 60 पेक्षा जास्त आरोग्य शिबिरांचे आयोजन
शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात 30,000 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2025 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
पंतप्रधानांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू केलेल्या भारत सरकारच्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या महत्त्वपूर्ण अभियानाची अंमलबजावणी करण्यात एक आघाडीची संस्था म्हणून, सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांनी (AFMS) ने 23 सप्टेंबर 2025 पर्यंत 60 पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमधून सुमारे 30,000 महिलांना सैन्यदलांच्या रुग्णालयांद्वारे लाभ मिळाला आहे.
या विविध आरोग्य शिबिरांमध्ये तज्ज्ञांकडून तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्तन, गर्भाशय आणि मुख कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांसाठी तपासणी केली जात आहे. गरोदर महिलांची काळजी, पोषण मार्गदर्शन आणि लसीकरण यांसारख्या माता आणि बाल आरोग्य सेवांवर विशेष भर दिला जात आहे.
भारत सरकारचे हे महत्त्वपूर्ण अभियान देशभरात महिला आणि कुटुंबांच्या आरोग्यासाठी एक आदर्श ठरत आहे. सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांचे (AFMS) महिलांच्या आरोग्यासाठी असलेले योगदान—सेवेतील तसेच समाजातील—‘विकसित भारत 2047’ चा एक महत्त्वाचा स्तंभ बनला आहे. हे सैनिकी वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधान्यक्रम यांच्यातील समन्वयाचे प्रतीक आहे.
‘सर्वे संतु निरामया’ या आपल्या ब्रीदवाक्यासाठी वचनबद्ध असलेल्या सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा (AFMS) या अभियानाला सक्रियपणे पाठिंबा देत आहेत. ‘संपूर्ण राष्ट्र’ या दृष्टिकोनानुसार, AFMS अंतर्गत सेवा रुग्णालये, केवळ सैनिकी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठीच नव्हे, तर जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दुर्गम भागांतील सामान्य नागरिकांसाठीही या अभियानाची प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा लागू करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि तज्ज्ञांची पथके तयार करण्यामध्ये आघाडीवर आहेत.
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/ प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170248)
आगंतुक पटल : 52