संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल आणि हेलेनिक नौदल यांच्यातील भूमध्य समुद्रातील पहिल्या द्विपक्षीय सागरी सरावाची  सांगता

Posted On: 20 SEP 2025 4:29PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदल आणि हेलेनिक नौदल यांच्यातील भूमध्य समुद्रातील पहिल्या द्विपक्षीय सागरी सरावाची 18 सप्टेंबर 2025 रोजी सांगता झाली, जो भारत आणि ग्रीस दरम्यानच्या वाढत्या संरक्षण सहकार्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. हा सराव दोन टप्प्यांत पार पडला - 13 ते 17 सप्टेंबर 2025 दरम्यान सलामिस नौदल तळावर बंदर टप्पा, आणि त्यानंतर 17 आणि 18 सप्टेंबर 2025 रोजी सागरी टप्पा. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व मार्गदर्शित क्षेपणास्त्र असलेली स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस त्रिकंदने केले.

बंदर टप्प्यात, दोन्ही नौदलांचे कर्मचारी परस्पर सामंजस्य आणि समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले. प्रमुख कार्यक्रमांमध्ये परिचालन परिचय बळकट करण्यासाठी आंतरजहाज भेटी, कर्मचाऱ्यांमधील व्यावसायिक संवाद आणि हेलेनिक नौदलाच्या एली वर्ग फ्रिगेट एचएस थेमिस्टोकल्सवर आयोजित प्रवासपूर्व परिषद यांचा समावेश होता. सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमादरम्यान जहाजावर महामहिम श्री रुद्रेंद्र टंडन, ग्रीसमधील भारताचे राजदूत, कमोडोर स्पायरीडॉन मॅन्टिस, कमांडर, सलामिस नौदल तळ आणि हेलेनिक नौदलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात भारताच्या समृद्ध परंपरांचे दर्शन घडले आणि दोन्ही सागरी दलांमधील संबंध अधिक दृढ झाले. याव्यतिरिक्त, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी अक्रोपोलिसचा पवित्र खडकाला भेट दिली.

सागरी टप्प्यात दोन्ही नौदलांच्या तुकड्यांमध्ये गुंतागुंतीच्या सागरी हालचाली आणि सामरिक सराव झाले. यामध्ये रात्रीच्या बोर्डिंग आणि शोध कार्यवाही (VBSS), समुद्रातील पुनर्भरण प्रक्रिया, संयुक्त पाणबुडीविरोधी युद्ध, परस्पर कार्यक्षमता वाढवण्यासाठी समन्वित गोळीबार आणि आंतरजहाज हेलिकॉप्टर कार्यवाही यांचा समावेश होता. या सरावांमुळे दोन्ही नौदलांच्या व्यावसायिक कौशल्यांची पुष्टी झाली आणि आव्हानात्मक सागरी परिस्थितीत संयुक्तपणे कार्य करण्याची क्षमता अधोरेखित झाली.

पहिल्या द्विपक्षीय सरावाचे यशस्वी आयोजन सागरी सुरक्षा आणि सहकार्यात्मक सहभागावर भारत आणि ग्रीस यांच्यातील वाढत्या एकरूपतेचे प्रतिबिंब आहे. जागतिक सागरी क्षेत्रात सुरक्षा, स्थैर्य आणि नौवहन स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यात दोन्ही देशांचे समान हितसंबंध आहेत. या सहकार्याने सर्वोत्तम पद्धतींचे आदान-प्रदान, आंतर-कार्यान्वयन विकसित करणे आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्याची मोलाची संधी उपलब्ध झाली.

सरावाच्या समाप्तीनंतर, आयएनएस त्रिकंद भूमध्य समुद्रात तिच्या तैनातीच्या पुढील टप्प्यासाठी रवाना झाली.

***

यश राणे / राजश्री आगाशे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169189) Visitor Counter : 17