संरक्षण मंत्रालय
सीडीएस द्वारे 22-23 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे त्रि-सेवा शैक्षणिक तंत्रज्ञान परिसंवादाचे आयोजन
Posted On:
20 SEP 2025 4:36PM by PIB Mumbai
सशस्त्र दले आणि भारतातील शैक्षणिक संस्थांमधील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि परस्परांबरोबरचे सहकार्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न म्हणून, 22 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान माणेकशॉ सेंटर, नवी दिल्ली येथे ट्राय-सर्व्हिसेस अकाडेमिया टेक्नॉलॉजी सिम्पोजियम, अर्थात त्रि-सेवा शैक्षणिक तंत्रज्ञान परिसंवाद (टी-एसएटीएस) आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान 22 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. अधिकृत परिसंवाद पोर्टलद्वारे शैक्षणिक संस्थांनी सादर केलेल्या 222 प्रतिसादांमधून निवड झालेल्या नवोन्मेशांच्या प्रदर्शनाचे ते उद्घाटनही करतील (www.tsats.org.in).
भारतीय लष्कराने एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा परिसंवाद आयोजित केला असून, राष्ट्रीय संरक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानाच्या विकासासाठी शैक्षणिक संशोधन आणि विकास परिसंस्थेमध्ये समन्वय साधणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. "विवेक व अनुसंध से विजय", ही या पहिल्या परिसंवादाची संकल्पना आहे.
या कार्यक्रमात 200 हून अधिक उच्च शैक्षणिक आणि 50 संशोधन आणि विकास संस्थांमधील संचालक आणि विभागप्रमुख, आयआयटी आणि टियर II आणि III तांत्रिक संस्थांमधील विद्यार्थी आणि तिन्ही सेवा दलांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील विषय तज्ञ एकत्र येतील. सेना दलांच्या परिचालनात्मक गरजांशी संबंधित अत्याधुनिक संशोधन आणि तांत्रिक उपाय ओळखण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीचे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून ते काम करेल.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे देखील 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिसंवादाला उपस्थित राहणार आहेत.
***
शैलेश पाटील / राजश्री आगाशे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2169089)