वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या संयुक्त अरब अमीरातीच्या दौऱ्यामुळे गुंतवणूक संवादाला गती मिळाली आणि आर्थिक भागीदारी अधिक दृढ झाली
Posted On:
19 SEP 2025 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी संयुक्त अरब अमिरातींबरोबर (यूएई) दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्यासाठी, गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि भारत-यूएई संबंध अधिक बळकट करण्यासाठी सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यावर लक्ष केंद्रित करत, अनेक बैठका घेतल्या.
संयुक्त अरब अमिराती-भारत व्यापार परिषद (यूआयबीसी) च्या गोलमेज परिषदेदरम्यान, मंत्र्यांनी भारतीय आणि यूएई च्या प्रमुख कंपन्यांच्या सीईओंशी संवाद साधला. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यापार मंत्री डॉ. थानी बिन अहमद अल झेयुदी यांच्यासह त्यांनी या परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले. भारत आणि युएईमधील वाढत्या आर्थिक भागीदारीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यामध्ये व्यापारी समुदायाने बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढवणे, व्यावसायिक भागीदारी मजबूत करणे आणि आर्थिक सहकार्याची नवीन क्षेत्रे ओळखणे यावर विचारांची देवाणघेवाण झाली.
मंत्री आणि प्रमुख यूएई च्या व्यावसायिक नेत्यांमधील संवाद सत्रात, गुंतवणूकीचा विस्तार आणि यूएईच्या कंपन्यांच्या प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्याची भारताची क्षमता यावर भर देण्यात आला.
या भेटींदरम्यान, युएईच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक स्नेही वातावरण वाढवण्यासाठी रचनात्मक दृष्टिकोन सामायिक केले, ज्यामध्ये बाजारपेठेतील प्रवेश, नियामक प्रक्रिया आणि विवाद निराकरणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता.
केंद्रीय मंत्र्यांनी पारदर्शक आणि सुलभ व्यावसायिक वातावरण मिळवून देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, आणि गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करण्यासाठी सरकारचे सुधारणांवर सातत्याने लक्ष असल्याचे अधोरेखित केले.
गोयल यांनी इंडिया पीपल्स फोरमच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला. ज्यामधून भारतीय समुदायाबरोबरचे सातत्यपूर्ण संबंध आणि भारत आणि युएई यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक बंध मजबूत करण्यामध्ये असलेली त्यांची अविभाज्य भूमिका प्रतिबिंबित होते.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168812)