सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधानांच्या स्मृतिचिन्हे ई-लिलाव 2025 मध्ये 101 अनमोल भेटवस्तूंच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वारशाचे दर्शन
Posted On:
19 SEP 2025 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
पंतप्रधान स्मृतिचिन्हे ई-लिलावाच्या 7 व्या आवृत्ती अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिल्या गेलेल्या 1,300 पेक्षा जास्त स्मृतिचिन्हांचा लिलाव सुरू आहे. या लिलावात महाराष्ट्रातून भेट दिल्या गेलेल्या 101 विशेष वस्तूंच्या समावेशासह महाराष्ट्राने आपली विशेष छाप सोडली आहे. या अनमोल भेटवस्तूंमधून महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कलात्मक वारसा अधोरेखित होतो. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे, नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला दालनाच्या वतीने आयोजित केलेला हा ई-लिलाव 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर थेट सुरू असणार आहे.
महाराष्ट्रातील भेटवस्तूंची काही खास वैशिष्ट्ये :
हस्तनिर्मित देवी कोराडी मातेची मूर्ती : ही कोराडी मातेची दोन रंगात रंगवलेली विलोभनीय लाकडी मूर्ती आहे. नागपूरजवळचे एक आराध्य दैवत असलेल्या कोराडी मातेच्या या मूर्तीतून स्थानिक कारागिरांची कलाकुसर आणि राज्यातील आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडते.

वारली कलाकुसर असलेले तारपा वाद्य : हे बांबूपासून बनवलेले तारपा नावाचे वाद्य असून ते अत्यंत बारकाईने केलेल्या वारली शैलीतील प्रतिमांनी सजवलेले आहे. या प्रतिमांमध्ये वादक आणि नर्तकांच्या वारली शैलीतील प्रतिमा साकारल्या आहेत. हे वाद्य महाराष्ट्राची आदिवासी संस्कृती, या समाजातील सलोखा आणि कथात्मक मांडणीच्या पारंपारिक कलेचे प्रतीक आहे.

नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार : ही भेटवस्तू म्हणजे एका फायबर काचेच्या पेटीत मांडलेले प्रभू श्री राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेले चांदीचे सुंदर शिल्प आहे. या शिल्पातून भक्ती आणि कारागिरीचे दर्शन घडते.

पंतप्रधान स्मृतिचिन्हे ई-लिलावाबद्दल:
पंतप्रधान स्मृतिचिन्हे ई-लिलावाची सुरुवात 2019 पासून झाली होती. या लिलावामुळे भारतासह परदेशातील नागरिकांना पंतप्रधानांना भेट दिलेल्या वस्तू मिळवण्याची संधी मिळते. त्याचबरोबर या लिलावातून मिळणारा सर्व निधी नमामी गंगे प्रकल्पाला दिला जात असल्याने, एका उदात्त कार्याला मदत करण्याचा उद्देशही यामुळे साध्य होतो. नमामी गंगे हा प्रकल्प म्हणजे गंगा नदीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठीचे भारत सरकारचे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. मागील काही लिलावामधून या उपक्रमासाठी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी संकलीत झाला आहे.
नागरिक, संग्राहक आणि कलाप्रेमींना या वर्षीच्या लिलावात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लिलावाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भावनेचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ कलाकृती मिळवण्यासोबतच भारताच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाच्या संवर्धनासाठीही हातभार लावता येणार आहे. अधिक माहिती आणि सहभागासाठी, www.pmmementos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168782)