वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी बिहारमध्ये पाटणा येथे अपेडाच्या पहिल्या कार्यालयाचे केले उद्घाटन


बिहारच्या कृषी निर्यात प्रवासाच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ

Posted On: 12 SEP 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025

बिहारला कृषी आणि प्रक्रिया-युक्त  अन्न उत्पादनांच्या निर्यातीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी बिहारमध्ये पाटणा येथे आयोजित बिहार आयडिया फेस्टिव्हलमध्ये कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा-APEDA) प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केले.

बिहारमधील समृद्ध कृषी-परिसंस्थेत शाही लीची, जरदाळू आंबा, मिथिला मखाना आणि मगही पान यांसारख्या विविध उच्च-क्षमता असलेल्या कृषी उत्पादनांसह, अनेक धान्ये, फळे आणि भाज्या यांचा समावेश आहे. यापैकी अनेक उत्पादनांना मिळालेल्या जीआय टॅगमुळे (GI) त्यांचे जागतिक आकर्षण वाढले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कृषी-व्यापार क्षेत्रात बिहारला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

अपेडाच्या पाटणा कार्यालयाच्या स्थापनेमुळे बिहारच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन युग सुरू झाले आहे. यामुळे शेतकरी, उत्पादक आणि निर्यातदारांना नोंदणी, सल्लागार सेवा, बाजारपेठ माहिती, प्रमाणपत्रांसाठी मदत, निर्यात प्रक्रिया सुलभ करणे, बाजारपेठ सुविधा, पायाभूत सुविधा विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधींपर्यंत थेट पोहोच मिळेल. आतापर्यंत, बिहारमधील निर्यातदार अपेडा च्या वाराणसी येथील प्रादेशिक कार्यालयावर अवलंबून होते. नवीन कार्यालय कृषी उत्पादन संघटना(FPOs), FPCs आणि निर्यातदारांना थेट पाठबळ देईल, ज्यामुळे निर्यातदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि राज्य-स्तरीय संस्थांशी समन्वय अधिक मजबूत होईल.

या प्रसंगी बोलताना,  पीयूष गोयल म्हणाले, "पाटणा येथे अपेडाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केवळ एक प्रशासकीय वाटचालीतील टप्पा नाही, तर बिहारच्या शेतकऱ्यांना जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे एक उद्दिष्ट आहे. आमचे शेतकरी, उद्योजक आणि निर्यातदारांमध्ये जगाला अन्न पुरवण्याची क्षमता आहे. योग्य पाठबळासह, बिहार उच्च-मूल्य आणि शाश्वत कृषी-निर्यात क्षेत्रात एक अग्रणी म्हणून उदयास येईल."

या उद्घाटन सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप देत, GI-टॅग असलेल्या 7 मेट्रिक टन मिथिला मखानाची पहिली खेप न्यूझीलंड, कॅनडा आणि अमेरिकेसाठी रवाना करण्यात आली.

सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2166075) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi