भूविज्ञान मंत्रालय
चीनमधील 18 व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाडमध्ये (IESO-2025) सहभागी झालेल्या भारतीय संघातील विजेत्या विद्यार्थ्यांचा पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला सत्कार
या प्रतिष्ठित जागतिक ऑलिंपियाडमध्ये भारतीय संघाने 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह पटकावली एकूण 7 पदके
स्टार्टअप क्षेत्रातील क्रांतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील तरुणांमध्येही महत्त्वाकांक्षेची भावना वाढल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
नवीन शैक्षणिक धोरण - 2020 (NEP-2020) युवा वर्गाला पारंपरिक विषयांच्या बंधनातून मुक्त करत त्यांच्या क्षमतेला वाव देत आहे : डॉ. जितेंद्र सिंह
विज्ञान ज्योती, शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती आणि संशोधन अनुदान यांसारख्या सरकारच्या नवीन योजना आणि उपक्रमांचा लाभ घेण्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
पृथ्वी विज्ञान, जैवतंत्रज्ञान, अंतराळ आणि स्टार्टअप-आधारित स्वयंरोजगार यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांकडे तरुणांचा कल
Posted On:
07 SEP 2025 1:16PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी चीनमधील 18 व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाडमध्ये (IESO-2025) सहभागी झालेल्या भारतीय संघातील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. चीनमधील जिनिंग इथे 8 ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीत ही ऑलिंपियाड आयोजित केली गेली होती.
या स्पर्धेत भारतीय संघाने 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. यासोबतच आंतरराष्ट्रीय भूविज्ञान युवा चळवळ वार्ताहर (International Geoscience Youth Movement - I-GYM Reporter) या श्रेणीतही भारतीय संघाने तिसरे बक्षीस पटकावले.
विजेत्यांमध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे : रायांश गुप्ता (सत पॉल मित्तल शाळा , लुधियाना, पंजाब) - सुवर्ण, रजत व I-GYM मधील तिसरे बक्षीस , चारुव्रत बैंस ( M.G.N पब्लिक स्कुल, कपुरथला , पंजाब ) - 2 रजत , 1 कांस्य , अपम निधी पांडे ( पीएम श्री के.व्ही . नंबर 1, जयपूर, राजस्थान)- 1 रजत , प्रियांशी घनघास ( MD इंद्रप्रस्थ उच्च माध्यमिक पब्लिक स्कुल , दिल्ली ) - 1 कांस्य .
प्रा देवेश वालिया आणि प्रा हेमा अच्युतन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं , तर निरीक्षक म्हणून डॉ. जगवीर सिंह , वैज्ञानिक -G यांनी काम पहिले.
देशाला हा सन्मान मिळवून दिल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी या तरुण विजेत्यांचे कौतुक केले. भारतात गेल्या दशकात घडून आलेल्या स्टार्ट अप क्रांतीमुळे विशेषतः श्रेणी 2 व श्रेणी 3 शहरांमधून येणाऱ्या युवकांमध्ये नवीन आकांक्षांच्या क्षितिजाला गवसणी घालण्याची इच्छाशक्ती या निकालांमधून दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) मुळे तरुणांच्या बुद्धीवरील विषयांची व शाखांची बंधने तुटून त्यांच्या मनातील प्रतिभा विकसित होत आहे व ते विविध विद्याशाखांमध्ये आपली क्षमता अजमावत असल्याचे मंत्रिमहोदयांनी अधोरेखित केले. यामुळे व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असून परंपरागत अभ्यासक्रमांकडून विद्यार्थी आता अधिक महत्वाच्या पृथ्वी विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, या शाखांकडे तसेच स्टार्ट अप आधारित स्वयंरोजगाराकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने सुरु केलेल्या विज्ञान ज्योती, शिष्यवृत्त्या , पाठ्यवृत्त्या व संशोधन अनुदानासारख्या अनेक उपक्रमांद्वारे मिळालेल्या संधींचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणून समाजाला त्यांचा फायदा करून द्यावा असे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांना केले.
मंत्रालयाकडून दर वर्षी भारतात 300 केंद्रांवर भारतीय राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड(INESO) भरवले जाते व याद्वारे IESO साठी विद्यार्थ्यांना साहाय्य दिले जाते , असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी सांगितले. यातून निवडलेल्या 30 विद्यार्थ्यांपैकी 4 जणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले जाते. गेल्या काही वर्षांमधील IESO मधली भारताची कामगिरी खूपच आशादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकण्याचेच उद्दिष्ट न ठेवता आपली क्षितिजे विस्तारावीत व समाजाच्या दीर्घकालीन कल्याणासाठी रोजच्या आयुष्यातील समस्या सोडवण्याकडे आपल्या बुद्धीचा वापर करावा असे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड (IESO) ची स्थापना 2003 साली आंतरराष्ट्रीय भूविज्ञान शिक्षण संस्थेने (IGEO) केली होती. जगभरातील उच्च माध्यमिक शाळेच्या ( इयत्ता नववी ते बारावी ) विद्यार्थ्यांसाठी ही एक वार्षिक स्पर्धा आहे. भारताचा संघ या स्पर्धेत 2007 सालापासून सहभागी होतो आहे , तसेच 2013 साली भारताच्या मैसूर शहरात 10 व्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



***
आशिष सांगळे / तुषार पवार/ उमा रायकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164501)
Visitor Counter : 2