संरक्षण मंत्रालय
भारत-सिंगापूर संरक्षण कार्यगटाची 16 वी बैठक सिंगापूर येथे संपन्न
Posted On:
05 SEP 2025 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2025
सिंगापूर येथे काल दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी भारत-सिंगापूर संरक्षण कार्यगटाची 16 वी बैठक आयोजित करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय सहकार्यविषयक संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सिंगापूरच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील धोरणविषयक कार्यालयाचे संचालक कर्नल डॅक्सन यॅप यांनी सदर बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.
यापूर्वी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्याच्या चर्चेदरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या तसेच विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य संबंधी उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याची तसेच बहुआयामी द्विपक्षीय संरक्षण कार्यक्रम आणि क्षेत्रीय सुरक्षा संबंधित रचना यांच्या संपूर्ण परिघाला सामावून घेणाऱ्या उपक्रमांची गती वाढवण्याची उत्तम संधी या बैठकीने उपलब्ध करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या आराखड्यासंदर्भातील नवीनतम संयुक्त निवेदनाबाबत उपरोल्लेखित बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.
दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या संरक्षण विषयक सहयोगाबाबत समाधान व्यक्त करत दोन्ही बाजूंनी सहयोगाच्या विद्यमान क्षेत्रांमध्ये, विशेषतः प्रशिक्षण, क्षमता निर्मिती, उद्योग आणि तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा तसेच बहुराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहयोगात आणखी वाढ करण्याचे मार्ग निश्चित केले. सहअध्यक्षांनी या बैठकीत सहकार्याच्या उदयोन्मुख क्षेत्रांच्या आणि जागतिकदृष्ट्या सामान्य समस्या सोडवण्याच्या दिशेने पावले टाकण्याचे मार्ग निश्चित केले.
वर्ष 2025 मध्ये भारत आणि सिंगापूर या देशांमध्ये राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगाने दोन्ही सह-अध्यक्षांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याबाबत अनुमोदन दिले. भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणामध्ये सिंगापूरने आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक बंधांना प्रोत्साहन देण्यात तसेच त्या परिसरातील देशांमध्ये धोरणात्मक संबंध विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर सदर बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
या बैठकीच्या अनुषंगाने, संयुक्त सचिवांनी सिंगापूरचे धोरणविषयक उपसचिव बीजी फ्रेडरिक चू यांची देखील भेट घेतली. तसेच या दौऱ्यात त्यांनी चांगी नौदल तळावरील माहिती फ्युजन सेंटर आणि आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीशी संबंधित सायबर सुरक्षा तसेच उत्कृष्टताविषयक माहिती केंद्राला देखील भेट दिली.
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164209)
Visitor Counter : 2