रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले इंडिया मेडटेक एक्स्पो 2025 चे उद्घाटन; जीएसटी सुधारणा आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गोयल यांचे प्रतिपादन
इंडिया मेडटेक एक्स्पो 2025 मध्ये सहभागी झालेल्या 30 हून अधिक देशांसमोर भारताला जागतिक मेडटेक उत्पादन केंद्र म्हणून सादर केले जात आहे
Posted On:
04 SEP 2025 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे इंडिया मेडटेक एक्स्पो 2025 च्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन झाले.
अलिकडेच करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर सुधारणा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साध्य करण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल असल्याचे, गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच, 140 कोटी भारतीयांनी 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याच्या सामूहिक संकल्प पूर्तीसाठी एकत्र येण्याचे आवाहन गोयल यांनी केले.

“कालच्या वस्तू आणि सेवा कर सुधारणा म्हणजे भारत आत्मनिर्भर बनेल याची खात्री करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे - असा स्वावलंबी भारत जो 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याच्या सामूहिक संकल्प पूर्तीसाठी एकत्र येणाऱ्या 140 कोटी भारतीयांची काळजी घेतो. एक असे विकसित आणि समृद्ध राष्ट्र जिथे प्रत्येकाला संधी मिळेल, जिथे प्रत्येकजण भारताच्या समावेशक आणि शाश्वत विकास कथेत भागीदार होईल,” असे ते म्हणाले.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी या कार्यक्रमात मुख्य भाषण करताना ‘जगाचे औषधालय’ म्हणून भारताची ओळख मजबूत करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अधिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“आयसीएमआर, आपल्या मेडटेक मित्रा आणि पेटंट मित्रा या उपक्रमाद्वारे, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना एकत्र आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि एकत्रितपणे आपण सर्वजण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देणार आहोत,” असे डॉ. बहल म्हणाले.

भारत जगभरातील व्यापारी भागीदारांशी सक्रियपणे संवाद साधत आहे जेणेकरून शुल्क कमी होईल, नियम एकसंध होतील आणि भारतीय निर्यातदारांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना, अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव यांनी सांगितले.
नियामक आघाडीवर भारताने अलिकडेच उचललेल्या पावलांबद्दल बोलताना, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचे (सीडीएससीओ) ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांनी सरकारच्या व्यवसाय सुलभतेसाठी वचनबद्धतेवर भर दिला आणि त्याचबरोबर काटेकोर अंमलबजावणीची खात्री असल्याचे सांगितले.
एक्स्पोमध्ये बोलताना,वैद्यकीय उपकरणांची निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (ईपीसीएमडी) कार्यकारी संचालक प्रवीण कुमार मित्तल यांनी नमूद केले की भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र, ज्याचे मूल्य सुमारे 15 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे, ते 2030 पर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज आहे. हे 800 हून अधिक स्टार्ट-अप, मजबूत संशोधन आणि विकास तसेच वाढत्या उत्पादन क्षमतेमुळे साध्य होईल, असे त्यांनी सांगितले.
"इंडिया मेडटेक एक्स्पो 2025, विकासाची गाथा प्रदर्शित करण्यासाठी तसेच भारत आणि जगभरातील आरोग्यसेवेच्या उपलब्धतेत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सहकार्याला चालना देण्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करेल," असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे, 4 ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान तीन दिवसांचा इंडिया मेडटेक एक्स्पो 2025 आयोजित करण्यात आला आहे. 'भारत : जागतिक मेडटेक उत्पादन केंद्र - अचूक अभियांत्रिकी तरीही परवडणारे' ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे. या प्रदर्शनामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप्स, संशोधन संस्था, राज्यांची विशेष प्रदर्शने, भविष्यातील नवोन्मेष दालन आणि केंद्र सरकारच्या विभागांद्वारे विविध प्रकारच्या नवोन्मेषांची आणि उपक्रमांची झलक सादर केली जाते.
या एक्स्पोमध्ये 30 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणारे 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले असून, यातून जागतिक भागधारकांना भारताच्या विस्तारणाऱ्या मेडटेक परिसंस्थेत भागीदारी आणि गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करत आहे.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163958)
Visitor Counter : 2