संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'युद्ध अभ्यास 2025' या भारत- अमेरिका संयुक्त युद्ध सरावासाठी भारतीय लष्कराची तुकडी अमेरिकेला रवाना

Posted On: 01 SEP 2025 5:15PM by PIB Mumbai

 

भारतीय लष्कराची एक तुकडी भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव 'युद्ध अभ्यास 2025' च्या 21 व्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या अलास्का इथल्या फोर्ट वेनराइटसाठी रवाना झाली आहे. हा सराव 1 ते 14 सप्टेंबर 2025 या काळात होणार आहे.

मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनमधले जवान आणि अमेरिकेच्या 11 व्या एअरबॉर्न डिव्हिजनच्या आर्क्टिक वोल्व्स ब्रिगेड कॉम्बॅट टीममधल्या 5 व्या इन्फंट्री रेजिमेंटच्या 'बॉबकॅट्स' बटालियनचे जवान या सरावात सहभागी होणार आहेत.

या दोन आठवड्यांमध्ये सैनिक विविध प्रकारच्या धोरणात्मक सरावांचा अभ्यास करतील. यामध्ये हेलिबॉर्न मोहिमा, पाळत ठेवणाऱ्या साधनांचा आणि मानवरहित हवाई प्रणालींचा वापर, रॉक क्राफ्ट, पर्वतीय युद्ध, जखमींना बाहेर काढणे, वैद्यकीय मदत आणि तोफखाना, विमान वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालींचा एकत्रित वापर यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, दोन्ही देशांच्या लष्कराचे विषय-तज्ञ मानवरहित हवाई वाहन आणि त्याचा मुकाबला करण्याच्या मोहिमा, माहिती युद्ध, दळणवळण आणि रसदव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित कार्यगटांचे आयोजन करतील.

हा सराव संयुक्तपणे आखलेल्या आणि अंमलात आणलेल्या धोरणात्मक युद्धाभ्यासांनी संपेल. यामध्ये प्रत्यक्ष गोळीबाराच्या सरावापासून ते उंच पर्वतीय युद्धातल्या परिस्थितीतल्या सरावांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी क्षमता सुधारणे आणि बहु-क्षेत्रीय आव्हानांसाठी सुसज्जता बळकट करण्यावर यामध्ये लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

***

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162800) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi