कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
“शासकीय सेवेत दाखल होणारे युवा अधिकारी हे 2047 मधल्या भारताचे शिल्पकार” लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे डॉ. जितेंद्र सिंह यांचे वक्तव्य
Posted On:
31 AUG 2025 7:42PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या 800 आसन क्षमतेच्या "कर्तव्यशील" या नवीन सभागृहाचे उद्घाटन केले. हे सभागृह 50 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी या सभागृहाचे वर्णन “कल्पनांचे, चर्चांचे आणि प्रेरणेचे केंद्र” असे केले. सर्व सेवांमध्ये दाखल होण्यासाठी आलेल्यांमध्ये सामुहिक शिक्षण आणि परस्पर सहकार वाढवण्याच्या उद्देशाने हे सभागृह तयार करण्यात आले आहे.
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (एलबीएसएनएए) येथे 2025 च्या तुकडीतील नागरी सेवकांच्या नवीन अधिकारी प्रशिक्षणार्थींसाठीच्या 100 व्या फाउंडेशन कोर्सला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रशिक्षणार्थींना आठवण करून दिली की " हे प्रशिक्षणार्थी 2047 च्या भारताचे शिल्पकार" आहेत आणि संविधानाचे रक्षणकर्ते म्हणून विकसित आणि नागरिक-केंद्रित राष्ट्र उभारणीत आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
देश आपल्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष 2047 साजरे करण्याकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे आज सेवेत प्रवेश करणाऱ्या या युवा नागरी सेवकांवर भारताच्या वाटचालीचा मार्ग ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी अकादमीच्या नवीन ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ (ओडीओपी) डिस्प्ले हॉल अर्थात एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन दालन आणि सुविधा केंद्राकडेही लक्ष वेधले. स्थानिक उद्योगांचे प्रदर्शन करुन त्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणे या उद्देशाने या दालनाची स्थापना करण्यात आली आहे.
नागरी सेवांच्या क्षमता विकासासाठी सरकार करत असलेल्या सुधारणांचा त्यांनी पुनरुच्चार केला. मिशन कर्मयोगीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की हा उपक्रम अधिकारी वर्गाला सातत्याने शिकण्याची साधने उपलब्ध करून देतो ज्यायोगे वेगाने बदलणाऱ्या प्रशासनिक वातावरणाशी त्यांना जुळवून घेता येईल. "जशा जबाबदाऱ्या बदलत जातात तसतसे तुम्ही जुळवून घेण्यास सक्षम बनले पाहिजे तसेच नम्रता, सचोटी आणि नैतिक धैर्य कायम राखले पाहिजे," असे ते म्हणाले.



***
निलीमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162543)
Visitor Counter : 2