संरक्षण मंत्रालय
आजच्या दहशतवाद, महासाथी आणि प्रादेशिक संघर्षांच्या युगात, संरक्षणातील स्वावलंबन हा केवळ एक पर्याय नाही, तर अस्तित्व आणि प्रगतीसाठीची गरज आहे- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा विजय आणि पाकिस्तानचा पराजय, लघु मुदतीचे युद्ध दिसत असले, तरी त्यामागे वर्षांनुवर्षांची रणनीती आणि संरक्षण तयारी दडलेली आहे- संरक्षणमंत्री
Posted On:
30 AUG 2025 1:06PM by PIB Mumbai
“भारताला कुणाशीही शत्रुत्व नको असले तरी आपल्या हितांशी भारत कधीही तडजोड करणार नाही. आपल्या लोकांचे, शेतकऱ्यांचे आणि लहान उद्योगांचे कल्याण हा आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. जितका अधिक दबाव येईल, भारत तितकाच अधिक बलवान होईल.”
“आजच्या दहशतवाद, महासाथी आणि प्रादेशिक संघर्षांच्या युगात, संरक्षणातील स्वावलंबन हा केवळ एक पर्याय नाही, तर अस्तित्व आणि प्रगतीसाठीची गरज आहे. हा मुद्दा केवळ संरक्षणाशी निगडित नसून भारताचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय स्वायत्ततेशी निगडित आहे”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ‘21 व्या शतकातील युद्ध’ या विषयावर 30 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीत आयोजित संरक्षण परिषदे मध्ये भाषण करताना राजनाथ सिंह बोलत होते. ही परिषद अशा वेळी भरली आहे, जेव्हा काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या लष्कराने शौर्य गाजवले आहे आणि जागतिक स्तरावर संघर्ष, व्यापार युद्ध आणि अस्थिरता सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जागतिक राजकारणातील बदलांनी देशाला दाखवून दिले आहे की संरक्षणासाठी इतरांवर अवलंबून राहणे आता शक्य नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मानते की केवळ आत्मनिर्भर भारतच आपली धोरणात्मक स्वायत्तता सुरक्षित ठेवू शकतो, असेही ते पुढे म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की व्यापार युद्ध आणि व्यापारशुल्क युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना अनेक विकसित देश संरक्षणासाठी बचावात्मक उपाय वापरत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की संरक्षणातील आत्मनिर्भरता म्हणजे इतरांपासून वेगळे राहणे असा अर्थ कुणी काढू नये.”हा मुद्दा केवळ संरक्षणाशी निगडित नसून भारताचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय स्वायत्ततेशी निगडित आहे. जेव्हा युवाबळ, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संधी यांनी युक्त देश आत्मनिर्भरतेकडे वळतो, तेव्हा जग थबकते आणि त्याकडे लक्ष देते. हीच ताकद भारताला जागतिक दबावांना तोंड देण्यास सक्षम करते आणि देशाला अधिक मजबूत बनवते,” असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे उत्तम उदाहरण म्हणून, राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचे गुणगान केले. त्यांनी सांगितले की लष्कराने आपल्या लक्ष्यांवर स्वदेशी शस्त्रांचा वापर करून केलेले अचूक हल्ले दाखवून देतात की दूरदृष्टी, दीर्घकालीन तयारी आणि समन्वयाशिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही. “ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा विजय आणि पाकिस्तानचा पराजय, लघु मुदतीचे युद्ध दिसत असले, तरी त्यामागे वर्षांनुवर्षांची रणनीती आणि संरक्षण तयारी दडलेली आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की भारताच्या लष्कराने, कठोर मेहनतीच्या आधारे आणि स्वदेशी उपकरणांच्या भरवशावर, ही मोहीम परिणामकारक आणि निर्णायकरित्या अंमलात आणली.
संरक्षणमंत्र्यांनी सुदर्शन चक्र मोहिमेचे वर्णन भारताच्या भविष्यातील सुरक्षेसाठी एक गेम-चेंजर ठरणारा उपक्रम म्हणून केले. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट पुढील दशकात देशभरातील महत्त्वाच्या ठिकांना हवाई संरक्षण देणे आहे आणि यासाठी बचावात्मक आणि आक्रमक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ऑपरेशन सिंदूर मधून घेतलेल्या धड्यांचा उल्लेख करताना राजनाथ सिंह यांनी आधुनिक युद्धांमध्ये हवाई संरक्षणाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 23 ऑगस्ट 2025 रोजी स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली, ज्यात एकाच वेळी तीन लक्ष्यांवर मारा करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली. हे पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर्ण अंमलबजावणीला वेळ लागेल, परंतु संरक्षण मंत्रालयाने या दिशेने निर्णायक पावले उचलली आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारने एक शक्तिशाली स्वदेशी विमान-इंजिन विकसित आणि तयार करण्याचे आव्हान स्वीकारले आहे, अशी घोषणा संरक्षण मंत्र्यांनी केली. या क्षेत्रात भारताला बराच काळ मर्यादित यश मिळाले होते. या महत्त्वाच्या प्रकल्पाची तयारी आता जवळजवळ पूर्ण झाली असून लवकरच कार्यक्षेत्रावर प्रत्यक्ष काम सुरू होताना दिसेल, असे त्यांनी सांगितले. त्याच्या महत्त्वावर भर देताना त्यांनी अधोरेखित केले की पूर्वी प्रश्न असा होता की भारत अशा प्रगत प्रणाली तयार करू शकतो का, परंतु आज त्या प्रणाली किती लवकर तैनात करता येतील इथवर हा प्रश्न बदलला आहे, असेही ते म्हणाले.
भारताचे आयातदार ते निर्यातदार अशा परिवर्तनाबाबत बोलताना, संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले की 2014 मध्ये 700 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात 2025 मध्ये सुमारे 24000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. “भारत आता #केवळ खरेदीदार नसून निर्यातदार बनला आहे. या यशात केवळ सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्समुळेच नाही तर खाजगी उद्योग, स्टार्ट-अप आणि उद्योजक यांचाही मोठा वाटा आहे ,” असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत कोणालाही शत्रू मानत नाही परंतु आपल्या हितांशीही तडजोड करणार नाही, याचा राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. “आम्ही कोणत्याही देशाला आपला शत्रू मानत नाही. परंतु आपल्या देशवासीयांचे, शेतकऱ्यांचे, लघुउद्योजकांचे आणि सामान्य नागरिकांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जग जितका जास्त दबाव आणेल तितकाच भारत अधिक मजबूत होईल,” असे ते म्हणाले.
या शतकाचा आढावा घेताना, संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की जगाने दहशतवाद आणि कोविड-19 साथीच्या आजारापासून ते युक्रेन, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील संघर्षांपर्यंत विध्वंसक आव्हाने पाहिली आहेत. त्याच वेळी, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन आणि अंतराळ विज्ञान यासारख्या तंत्रज्ञानामुळे जीवन आणि सुरक्षेचे स्वरूप बदलत आहे. "हे शतक कदाचित सर्वात अस्थिर आणि आव्हानात्मक आहे. अशा जगात, भारताचा एकमेव शाश्वत मार्ग म्हणजे आत्मनिर्भरता," असे त्यांनी नमूद केले.
युद्धाच्या काळात माध्यमांच्या भूमिकेचे महत्त्व सांगताना, त्यांनी संवेदनशीलता बाळगण्याचे आवाहन केले. "एक छोटासा अहवाल लाखो लोकांचे मनोबल वाढवू शकतो, परंतु एक चूक जीवितहानी करु शकते. संघर्षाच्या काळात, स्वातंत्र्य आणि जबाबदारी हातात हात घालून चालली पाहिजे. माध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, सोबतच ती राष्ट्रीय सुरक्षेची पहारेकरी देखील ठरतात," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
"संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत ही केवळ घोषणा नाही, तर भारताच्या सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रगतीचा एक रोडमॅप आहे. येत्या काही वर्षात, भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करणार नाही तर जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार देखील बनेल. ही दृष्टी भारताला 21 व्या शतकात एक निर्णायक शक्ती म्हणून प्रस्थापित करेल." असे संरक्षण मंत्री आपल्या भाषणाच्या शेवट आत म्हणाले. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
शैलेश पाटील / आशुतोष सावे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162375)
Visitor Counter : 17