गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणांची त्वरित स्वच्छता करुन सहज दिसण्यात येईल अशा स्वरूपात स्वच्छता राखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा, केंद्र सरकारचा सर्व राज्यांना सल्ला
Posted On:
30 AUG 2025 1:49PM by PIB Mumbai
“आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की स्वच्छता फक्त एका दिवसाची, एका पंधरवड्याची, एका वर्षाची किंवा काही लोकांची जबाबदारी नाही. स्वच्छता ही प्रत्येकाची, प्रत्येक दिवसाची, प्रत्येक पंधरवड्याची, प्रत्येक वर्षाची आणि पिढ्यानुपिढ्या चालणारी महा मोहीम आहे. स्वच्छता ही जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनाची मंत्र आहे.” – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA), स्वच्छ भारत मिशन-शहर 2.0 या मोहिमेसंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उच्चस्तरीय बैठक घेतली. या विभागाचे केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री तोखन साहू, तसेच सचिव एस. काटिकिथळा यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत, भारताच्या शहरी भागातील दृष्यमान (सहज दिसण्यात येणाऱ्या) स्वच्छतेवर विशेष भर दिला गेला आणि स्वच्छता लक्ष्यांची (Cleanliness Target Units – CTUs) ओळख (ठिकाण निश्चित करणे) आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दुहेरी दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित केले गेले.

‘स्वच्छताही सेवा 2024’ या उपक्रमा अंतर्गत 8 लाखांहून अधिक स्वच्छता लक्ष्य ठिकाणांची (CTUs) स्वच्छता झाल्यानंतर, गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने राज्यांना कळकळीचे आवाहन केले आहे की त्यांनी शहरी दृष्यमान स्वच्छतेवर प्राधान्य द्यावे. यासाठी दुर्लक्षित, दुर्गम आणि अंधाऱ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून ठराविक कालमर्यादेत स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे.

शहर विकास आणि धोरण अंमलबजावणीसाठी, स्वच्छता लक्ष्य ठिकाणे (CTUs), ही बदलाची मुख्य साधने असल्याचे अधोरेखित करत, केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी सांगितले की स्वच्छता आणि शहर विकास, एकमेकांसोबत नांदतात….या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने या शहरी ठिकाणांची ठराविक कालमर्यादेत स्वच्छता करण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. यात राज्यांद्वारे नियमित पुनरावलोकन आणि कडक देखरेख, नागरिकांचा सहभाग आणि स्वच्छता अॅप द्वारे CTUs चे नकाशांकन, नकाशांकित ठिकाणांचे त्वरित स्वच्छता कार्य, त्यांचे सौंदर्यीकरण आणि पुन्हा घाण जमा होण्यापासून प्रतिबंध करणे, यावर भर देण्यात आला आहे.
ही स्वच्छता लक्ष्य ठिकाणे (CTUs), ‘स्वच्छताही सेवा’ या पोर्टल वर नकाशांकित केली जातील. दुर्लक्षित आणि कठीण ठिकाणांवर विशेष लक्ष देत, शहरातील नेहमीची कचरा साठवण्याची ठिकाणे (Legacy Waste Dumpsites), उच्च-तीव्रतेची CTUs म्हणून निश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, ज्यांच्या स्वच्छतेसाठी अधिक वेळ आणि साधने आवश्यक असतील. CTUs दत्तक घेण्यासाठी,सार्वजनिक उपक्रम (PSUs), खासगी कंपन्या, औद्योगिक सामाजिक जबाबदारी (CSR) गट, स्वयंसेवी संस्था (NGOs), स्टार्टअप्स आणि इतर भागधारकांशी, शहरी स्थानिक संस्थांना (ULBs) सहयोग करता येईल.
शहरांनी स्वच्छता लक्ष्य ठिकाणे (CTU) ओळखण्यासाठी आणि त्यांचे रूपांतर करण्यासाठी स्वच्छता अॅपचा वापर आणि अंगिकार करण्यास प्रोत्साहन द्यावे. 2 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या या अॅपवर जेव्हा एखादी तक्रार नोंदवली जाते तेव्हा ते स्थान, छायाचित्रे आणि सीटीयू तपशील नोंदवते आणि संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना स्वयंचलितपणे सोपवते. तक्रार नोंदवताना आणि निकाली काढताना सूचना पाठवल्या जातात आणि नागरिकांना तक्रारींची पुष्टी करण्यासाठी किंवा पुन्हा तक्रार नोंदवण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेसाठीच्या आवाहनाचा पुनरुच्चार करताना, केंद्रीय मंत्री मनोहर लाल म्हणाले, "स्वच्छता लक्ष्य ठिकाणे स्वच्छता म्हणजे सहज नजरेसमोर येणाऱ्या ठिकाणांचे अभिमानाच्या स्थळात रूपांतरित करणे, सार्वजनिक ठिकाणांना सन्मानपूर्वक पुनरुज्जीवित करणे, आणि स्वच्छता ही केवळ कागदोपत्री न राहता ती प्रत्येक नागरिकाला आपल्या दैनंदिन जीवनात दिसेल, जाणवेल, आणि अनुभवता येईल याची खात्री करणे होय.”
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री तोखन साहू यांनी राज्यांना घनकचरा व्यवस्थापनाच्या जलद उपाययोजनांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियान - शहरी 2.0 पूर्ण होण्यासाठी केवळ 12 महिने शिल्लक राहिले असताना, निर्धारित वेळेत सर्व प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगाने पुढे जाण्याची वेळ आली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

स्वच्छ शहर निर्माण करणे आणि स्वच्छ भारत अभियान - शहरी 2.0 अंतर्गत क्षमता बळकट करणे या उद्दिष्टांच्या अनुषंगाने गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाने स्वच्छ शहर जोडी (एसएसजे) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, स्वच्छ शहर 2024-25 मधील 72 सर्वोत्तम कामगिरी करणारी शहरे 72 निम्नस्तरीय कामगिरी करणाऱ्या शहरांना मार्गदर्शन करतील आणि मदत करतील. 'इच वन टीच वन' संकल्पनेवर आधारित स्वच्छ शहर जोडी अभियानाचे उद्दिष्ट यशस्वी स्वच्छता मॉडेल्सचा प्रभाव वाढवणे असून मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी शहरांदरम्यान संरचित मार्गदर्शन, सहकारी शिक्षण तसेच संयुक्त कृती संस्थात्मक स्वरूपात रुजवण्याचा प्रयत्न आहे.
केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत, गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाने स्वच्छ भारत मोहीम - शहरी 2.0 अंतर्गत प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दोन राज्य बैठका घेतल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने जुना कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांची स्थापना यावर लक्ष केंद्रित केले गेले. कचरामुक्त शहरे हे उद्दिष्ट जलदगतीने साध्य करण्यासाठी, मंत्रालयाने राज्यांना आक्रमक देखरेख, दैनंदिन आढावा आणि जलद गतीने कचरा प्रक्रिया केंद्रे आणि कचरा डेपो पुनर्निर्मिती करण्याचे आवाहन केले.
***
शैलेश पाटील / आशुतोष सावे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162283)
Visitor Counter : 18