संरक्षण मंत्रालय
भारत आणि सौदी अरेबियामधील संरक्षण सहकार्य विषयक संयुक्त समितीची 7 वी बैठक नवी दिल्ली इथे संपन्न
Posted On:
28 AUG 2025 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
भारत आणि सौदी अरेबियामधील संरक्षण सहकार्य विषयक संयुक्त समितीची (JCDC) 7 वी बैठक आज दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली इथं पार पडली. भारताच्या वतीने संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांनी, तर सौदी अरेबियाच्या वतीने स्टाफ मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकथिरी हे या बैठकीच्या सह-अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याबद्दलची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली, तसेच याआधी झालेल्या संरक्षण सहकार्य विषयक संयुक्त समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परस्परांतील संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि सहकार्याच्या नवीन संधींच्या शक्यता तपासून पाहण्यासाठी दोन्ही देशांनी प्रशिक्षण विषयक सहकार्य, औद्योगिक भागीदारी, सागरी सहकार्य आणि लष्करी सराव यांसारख्या क्षेत्रांबाबतही चर्चा केली.
या बैठकीत आपापल्या प्रशिक्षण क्षमता आणि गरजांवरही चर्चा केली गेली. याअनुषंगाने भारताने सौदी अरेबियाच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली, तसेच सायबर, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन आणि रणनैतिक संवाद यांसारख्या क्षेत्रांमधल सहकार्यावरही चर्चा केली.
या बैठकीत भारताने आपल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या प्रगतीबद्दलची माहिती दिली, तसेच मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या अत्याधुनिक उपकरणेही दर्शवली. सौदी अरेबियासोबत संरक्षण विषयक उपकरणांच्या संयुक्त उत्पादनासाठी आणि भागीदारीसाठीच्या संधींच्या शक्यतांवरही या बैठकीत चर्चा झाली. या वर्षी नौदल आणि लष्कर स्तरावरील चर्चा यशस्वी झाल्याबद्दल दोन्ही सह-अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले तसेच अशीच चर्चा पुढे ठेवण्यावर सहमतीही व्यक्त केली.
भारत आणि सौदी अरेबियामधील संरक्षण क्षेत्रातली भागीदारी सातत्याने वृद्धींगत होत आहे. एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान, धोरणात्मक भागिदारी परिषदेअंतर्गत संरक्षण सहकार्यावरील मंत्रिपद समितीच्या स्थापनेतूनही या वाढत्या संबंधांची प्रचिती आली आहे.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161697)
Visitor Counter : 27