सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
‘महासागर लेखांकनाच्या विकासासाठी किनारी राज्यांची क्षमता वृद्धी’ या विषयावरील कार्यशाळेचे 29 ऑगस्ट 2025 रोजी कोची येथे आयोजन
Posted On:
27 AUG 2025 12:50PM by PIB Mumbai
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) कडून केरळच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाच्या (DES), सहकार्याने 29 ऑगस्ट 2025 रोजी केरळमधील कोची येथे “महासागर लेखांकनाच्या विकासासाठी किनारी राज्यांची क्षमता वृद्धी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली जात आहे. कार्यशाळेचा मुख्य उद्देश किनारी राज्यांना त्यांचे स्वतःचे महासागर लेखांकन तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे, ज्यामुळे SEEA अर्थात पर्यावरणीय आर्थिक लेखा प्रणाली आराखड्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय बांधिलकी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर महासागर लेखांकनांचा विकास साधता येईल. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) 22 जानेवारी 2025 रोजी “भारतातील महासागर परिसंस्था लेखाकन: एक चौकट (तज्ञ गटाचा अहवाल)” देखील प्रकाशित केला आहे. या अहवालात विविध महासागर परिसंस्थांसाठी व्याप्ती, स्थिती, सेवा आणि मालमत्ता लेखांकन या घटकांवरील पर्यावरणीय आणि आर्थिक माहिती विकसित करण्याचा मार्ग सुचवण्यात आला आहे, ज्यामुळे भारतातील विकास आणि शाश्वत महासागर व्यवस्थापन यामध्ये संतुलन राखत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल.
या कार्यशाळेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, सर्व किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय (DES), राज्य मत्स्यव्यवसाय विभाग, राज्य पर्यटन विभाग, “भारतातील महासागर परिसंस्था लेखांकनावरील तज्ञ गटा”चे सदस्य तसेच महासागराशी संबंधित कार्यात गुंतलेल्या प्रख्यात संस्थांसह विविध भागधारकांचा सहभाग असेल.
या कार्यक्रमात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव, केंद्रीय सांख्यिकी महासंचालक आणि केरळ सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तांत्रिक सत्र I :
या सत्रात SEEA ची रुपरेषा, "भारतातील महासागर परिसंस्था लेखांकन: एक चौकट" या अहवालाचा आढावा, महासागर लेखांकनातील जागतिक सर्वोत्तम पद्धती यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. याशिवाय सत्रात केरळ किनारपट्टी संबंधित विशिष्ट माहिती आणि महासागर लेखांकनासाठी हा डेटासेट वापरून येणाऱ्या आव्हानांवर चर्चा समाविष्ट असेल.
तांत्रिक सत्र II :
या सत्रात "ब्लू इकॉनॉमी पाथवेजमधील महासागर लेखांकन विभाग: तामिळनाडू केस स्टडी" या अहवालाचे सादरीकरण केले जाईल, तसेच हवामान बदल आणि महासागर लेखांकन, त्याचा सागरी जैव संपत्तीवर होणारा परिणाम, आधुनिक समुद्रशास्त्रातील नवोन्मेष यावर खुली चर्चा आणि प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले जाईल.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2161226)