संरक्षण मंत्रालय
विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी युद्धनौकांचा नौदलाच्या ताफ्यात समावेश
नव्या पिढीतील शस्त्रे आणि प्रणालींनी सुसज्ज, या युद्धनौकांमुळे सागरी मोहिमांमध्ये व्यापक प्रमाणात राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याची नौदलाची क्षमता वाढणार
या युद्धनौका हिंद महासागर क्षेत्रातील प्रथम प्रतिसादकर्ता आणि पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करतील: संरक्षण मंत्री
"आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी ही सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाची झळाळती उदाहरणे आहेत"
"आत्मनिर्भरता आता केवळ एक घोषणा राहिली नाही, तर ती वास्तवात साकारत आहे; भविष्यकालीन दृष्टिकोनातून सशस्त्र दलांना बळकट केले जात आहे"
Posted On:
26 AUG 2025 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2025
भारताचे वाढते जहाजबांधणी सामर्थ्य आणि स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने वाटचालीचा दाखला म्हणून, प्रोजेक्ट 17ए च्या दोन बहु-उद्देशी युद्धनौका - आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी यांचा -26,ऑगस्ट 2025 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई [आयएनएस उदयगिरी] आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई), कोलकाता [आयएनएस हिमगिरी] - या दोन वेगवेगळ्या शिपयार्ड्सनी स्वदेशी पद्धतीने बांधणी केलेल्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रथमच एकाच वेळी नौदलात दाखल करण्यात आल्या आहेत.

आपल्या भाषणात, संरक्षणमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की या युद्धनौका सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच सागरी हितांचे देखील रक्षण करतील तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये देखील मदत करतील. त्यांच्या समावेशामुळे भारताच्या शेजारी प्रथम आणि महासागर (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती) या धोरणाला चालना मिळेल. भारतीय नौदलाची क्षमता वाढवणाऱ्या या युद्धनौकांनी संदेश दिला आहे की भारत आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे आणि कोणत्याही परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यास सज्ज आहे,” असे ते म्हणाले.

आत्मनिर्भर नौदल
आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या प्रोजेक्ट 17 (शिवालिक श्रेणी) वर्गातील प्रमुख जहाज आयएनएस नीलगिरीच्या उत्तराधिकारी आहेत. यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, कमी रडार सिग्नेचर,टेहळणीसाठी प्रगत रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुपरसॉनिक पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आणि रॅपिड -फायर गन प्रणाली समाविष्ट आहेत. दोन्ही जहाजांमध्ये एकत्रित डिझेल किंवा गॅस प्रोपल्शन प्लांट आणि अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यामुळे उच्च वेग आणि सुधारित इंधन कार्यक्षमता साधता येते.

भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने स्वतः डिझाइन केलेल्या आणि भारतात निर्मित या 100 व्या आणि 101व्या युद्धनौका आहेत, ज्या स्वदेशी सामग्री आणि स्वयंपूर्णता वाढवण्याप्रति नौदलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत. अनेक एमएसएमईंच्या सहभागामुळे आणि भारतीय मूळ उपकरण उत्पादकांकडून प्रमुख शस्त्रे आणि सेन्सर्स खरेदीद्वारे 75% पेक्षा अधिक उच्च स्वदेशी सामग्री वापरणे शक्य झाले आहे.

संरक्षणमंत्र्यांनी या युद्धनौकांच्या समावेशाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक मोठे पाऊल आणि सरकारच्या दृष्टिकोन आणि वचनबद्धतेचा दाखला असे केले. “आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी ही सरकारच्या आत्मनिर्भरते प्रति दृढ संकल्पाचे झळाळते उदाहरण आहेत, परिवर्तनकारी चळवळीचे प्रतीक आहेत आणि सर्व संबंधितांच्या एकत्रित प्रयत्नांनी देश नवी उंची गाठेल आणि स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट साध्य करेल या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत,” असे त्यांनी सांगितले. दोन शक्तिशाली युद्धनौका तयार करून नौदलाला पुरवण्यात एमडीएल आणि जीआरएसई यांच्यातील सहकार्य आणि समन्वयाची त्यांनी प्रशंसा केली.
ब्लू वॉटर नेव्ही अर्थात सागरी नौदल
मल्टी-मिशन फ्रिगेट्स अर्थात बहु-उद्देशीय युद्धनौका हे नौदलाच्या कार्यान्वयातील महत्त्वपूर्ण सहाय्यक घटक असणार आहेत. या युद्धनौकांमुळे नौदलाची सागरी मोहिमांमध्ये राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याची क्षमता वाढणार आहे. या युद्धनौका भावी पिढीतील शस्त्रे, सेन्सर्स अर्थात संवेदके आणि एकात्मिक व्यासपीठ व्यवस्थापन यंत्रणेने सुसज्ज आहेत. यासोबतच युद्धपरिस्थितीत हवाई हल्ले प्रतिबंधक (अँटी-एअर), भू हल्ला प्रतिबंधक (अँटी-सर्फेस) आणि पाणबुडी हल्ला प्रतिबंधक (अँटी-सबमरीन), सागरी नियंत्रण आणि मानवतावादी कार्ये करण्याच्या सुविधांनी सज्ज आहेत.
आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी यांच्या समावेशामुळे भारताच्या नौदलाची लढाऊ क्षमता वाढण्यासोबतच, हिंदी महासागर क्षेत्रात पहिला प्रतिसाद देणारे, आणि प्राधान्यक्रमावरचा सुरक्षाविषयक भागीदार म्हणूनही भारतीय नौदलाची भूमिका अधिक बळकट झाली असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. समुद्री चाच्यांचा सामना करणे, तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध लढा देणे, सागरी दहशतवाद रोखणे अथवा नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत पुरवणे, या अत्यंत जटील आणि जोखमीच्या कार्यांमध्ये या युद्धनौका निर्णायक सिद्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अरबी समुद्रापासून मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकी किनारपट्टीपर्यंत सुरू असंख्य नौदल विषयक घडामोडी होत असतात, अशा परिस्थितीत, भारतीय नौदल देशाच्या हितांचे रक्षण करत आहे, आणि त्यामुळेच ते भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे, असेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
आपले नौदल आपल्या राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयाला आले असल्याच्या शब्दांत त्यांनी भारतीय नौदलाची प्रशंसा केली.
भारत आक्रमक विस्तारवादावर विश्वास ठेवणारा देश नाही. आपण कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही, किंवा तशा अनुषंगाने कधीला कुणाला चिथावणी देत नाही, पण, यामुळे जे भारताचे नुकसान करू इच्छितात त्यांच्यापुढे आपण नमते घेऊ असा याचा अर्थ होत नाही ही बाब त्यांनी ठामपणे अधोरेखित केली.

भविष्याच्यादृष्टीने सज्ज नौदल
आज भारत जमीन, समुद्र आणि आकाशासोबतच, अंतराळ, सायबर अवकाश, आर्थिक अवकाश आणि सामाजिक अवकाशाचेही संरक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भरता ही आता केवळ एक घोषणा राहिलेली नसून, ती प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव बनू लागले असल्याचे ते म्हणाले.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. भारताच्या नौदलात एकाच वेळी दोन युद्धनौकांचा समावेश होणे ही घटना, भारताच्या सागरी सामर्थ्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि गतिशील विस्ताराचा ठळक पुरावा असल्याचे ते म्हणाले.
आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरीबद्दल अधिक माहिती
आपल्या या पूर्वीच्या गौरवशाली जहाजाच्या नावावरून नवीन जहाजांचे नामकरण करण्याच्या नौदलाच्या परंपरेनुसार, नवीन उदयगिरी आणि हिमगिरी या युद्धनौकांना त्यांच्या आधीच्या युद्धनौकाची अभिमानास्पद नावे बहाल केली गेली आहेत. या युद्धनौकांनी अनेक दशके देशाला सेवा दिली. आधुनिक उदयगिरीच्या नामकरणातून 1976 ते 2007 या काळात सेवा दिलेल्या जुन्या आयएनएस उदयगिरीच्या कामगिरीचा गौरव केला गेला तर हिमगिरीच्या नामकरणातून 1974 ते 2005 या काळात सेवा दिलेल्या जुन्या हिमगिरीचा कामगिरीचा सन्मान करण्यात आला. नौदल आपल्या परंपरेच्या माध्यमातून नवीन युद्धनौकांचा समावेश, भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि भविष्यातील आशा आकांक्षांशी जोडते.

या दोन मोठ्या युद्धनौकांचा एकाचवेळी समावेश होण्याच्या घडामोडीतून, भारतीय नौदलाने देशाच्या, पूर्व किनारपट्टीवरील कार्यान्वयावर दिलेला भर अधोरेखित झाला आहे. या दोन्ही युद्धनौका पूर्व नौदल कमांडच्या पूर्व ताफ्यात सामील होणार आहेत. यामुळे बंगालच्या उपसागरात आणि त्यापलीकडच्या सागरी प्रदेशातील आपत्कालीन परिस्थितीला वेगाने आणि तात्काळ प्रतिसाद देण्याची तसेच देशाच्या दृष्टीने सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याची भारताची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
या दोन युद्धनौकांच्या समावेशाच्या निमित्ताने आज झालेल्या कार्यक्रमातून भारताचा स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेवरचा वाढलेला विश्वास ठळकपणे अधोरेखित झाला, तसेच जागतिक तोडीचे जटील मंच उभारणी आणि त्यांचे कार्यान्वयन यासाठीचा आपला निर्धार पुन्हा दर्शवला आहे.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161039)