संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भरता आणि एकसंध पुरवठा व्यवस्थेच्या साहाय्याने सर्व आघाड्यांवर दिलेले निर्णायक संयुक्त प्रत्युत्तर हेच भविष्यातील युद्धांतील यशाचे गमक ठरेल – संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांचे रण संवादात प्रतिपादन

Posted On: 26 AUG 2025 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2025

 

भविष्यातील रणांगणावर सेवांमधील सीमारेषा गौण ठरतील, त्यामुळे भविष्यातील युद्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व क्षेत्रांतून जलद आणि निर्णायक संयुक्त प्रतिसाद आवश्यक आहे, असे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी प्रतिपादन केले. ते आज 26 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये होत असलेल्या ‘रण संवाद’ या युद्ध, युद्धशास्त्र आणि युद्धनीतीवरील त्रिसेवा चर्चासत्रात ‘युद्धावर तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर व्याख्यानात  बोलत होते.

जनरल चौहान यांनी संरक्षणातील आत्मनिर्भरता आणि एकसंध पुरवठा प्रणालीला भविष्यातील युद्धांतील विजयाचे मुख्य घटक संबोधले. भारताच्या परिवर्तनासाठी ‘संयुक्तता’ ही पायाभूत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, क्वांटम यांसारखी सतत विकसित होणारी तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच संयुक्त प्रशिक्षण संस्थात्मक करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरी-लष्करी एकात्मता अधिक बळकट करण्यासाठी भारताचे स्वतःचे ‘सुदर्शन चक्र’ (संरक्षण कवच) विकसित करण्याच्या महत्त्वावर आणि बांधिलकीवर त्यांनी भर दिला.जे ‘ढाल आणि तलवार’ दोन्हीप्रमाणे कार्य करेल, असे ते म्हणाले. बहुआयामी क्षमतावृद्धी ही भविष्यातील युद्धांमध्ये विजय मिळवण्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत प्राचीन काळापासून ज्ञान आणि विचारांचा केंद्रबिंदू राहिला आहे,  हे सांगत असताना जनरल चौहान यांनी कौटिल्यांचा संदर्भ दिला. परंतु, भारतीय युद्धांच्या शास्त्रीय विश्लेषणावर किंवा युद्धनीतीवरील शैक्षणिक चर्चेसाठी मोजकेच साहित्य उपलब्ध आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.  युद्ध, नेतृत्व, प्रेरणा, मनोबल आणि तंत्रज्ञान या विविध पैलूंवर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. भारताला ‘सशक्त, सुरक्षित, आत्मनिर्भर आणि विकसित’ करायचे असेल तर सर्व सहभागींनी एकत्रितपणे भविष्यासाठी सक्षम सैन्यदल घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही, असे चौहान यांनी सांगितले.

‘रण संवाद’ या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष रणांगणाशी निगडित  कर्मचाऱ्यांनी विशेषतः तरुण आणि मध्यम स्तरातील अधिकाऱ्याना तांत्रिक प्रगतीची जाणीव असते, त्यामुळे त्यांचे मतप्रवाह ऐकणे आवश्यक आहे. नवीन कल्पना आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा अनुभव यांचा संगम घडवून आणण्यासाठी सुसंवादाची परिसंस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या दोन दिवसीय चर्चासत्रात कार्यरत सैन्याधिकारी धोरणात्मक संवादाच्या अग्रभागी येणार आहेत. संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह उद्या 27 ऑगस्ट रोजी समारोप सत्रात  प्रमुख भाषण करतील. या कार्यक्रमादरम्यान काही संयुक्त सिद्धांत तसेच तंत्रज्ञान दृष्टिकोण व क्षमता आराखडा  प्रकाशित करण्यात येणार आहे.

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160930)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil