युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 ‘क्रीडा व फिटनेस जनचळवळ’ म्हणून तीन दिवस साजरा होणार
Posted On:
25 AUG 2025 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2025
युवा कार्य व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या आवाहनानंतर या वर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 खऱ्या अर्थाने जनचळवळ म्हणून साजरा करण्यासाठी देशभरातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, झारखंड, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच पुद्दुचेरी, चंदीगड आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या संबंधित विभागांना तयारीसंदर्भात निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिन (एनएसडी) 2025 या वर्षी फिट इंडिया मोहिमेच्या ध्वजातहत 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत तीन दिवसांचा देशव्यापी क्रीडा व फिटनेस जनचळवळ म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीची प्रेरणादायी संकल्पना आहे – “एक तास, खेळाच्या मैदानात.”
या उपक्रमाचा उद्देश दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक क्रियाकलापासाठी द्यावेत, याबाबत जागरूकता निर्माण करणे व जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या आजारांपासून बचाव करणे हा आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 चा आत्मा ऑलिम्पिक मूल्ये – उत्कृष्टता, मैत्री, सन्मान तसेच पॅरालिम्पिक मूल्ये – धैर्य, दृढनिश्चय, प्रेरणा व समानता यांना विशेष महत्व देतो.
वर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन खऱ्या अर्थाने जनचळवळ ठरणार आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांमधील 35 कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी, माय भारत व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे स्वयंसेवक, युवक मंडळे, रहिवासी संघटना (आरडब्ल्यूए), ग्रामपंचायती, शहरी स्थानिक संस्था (यूएलबी), कॉर्पोरेट, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू), भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए), पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय), राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ), क्रीडा प्राधिकरण (एसएआय) तसेच असंख्य सामुदायिक गट यात सहभागी होऊन क्रीडा व फिटनेसचा राष्ट्रीय उत्सव साजरा करतील.
प्रसिद्ध खेळाडू व लोकप्रतिनिधीही देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रीडा उपक्रमांत सहभागी होणार आहेत. या उत्सवाची रचना सर्व वयोगटांचा समावेश करणारी आहे. यासोबतच आत्मनिर्भर भारत या संकल्पनेखाली राष्ट्रीय क्रीडा साहित्य निर्मिती परिषद आयोजित केली जाणार आहे. तसेच फिट इंडिया अॅप मध्ये कार्बन बचत प्रोत्साहन सुविधा सुरू केली जाणार असून, पर्यावरणपूरक सवयी रुजवणे व नागरिकांना अधिक निरोगी, शाश्वत जीवनशैलीकडे प्रेरित करणे हा यामागचा हेतू आहे.
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160762)