अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

सन 2040 मध्ये एक भारतीय चंद्रावरून ‘विकसित भारत 2047 ची घोषणा देईल आणि जगभरात भारताच्या आगमनाचा संदेश जाईल-केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा विश्वास

Posted On: 23 AUG 2025 5:14PM by PIB Mumbai

 

सन 2040 मध्ये एक भारतीय चंद्राच्या पृष्ठभागावरून‘विकसित भारत 2047’ ची घोषणा देईल, आणि त्यामुळे जगभरात भारताच्या आगमनाचा संदेश जाईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित राष्ट्रीय अंतराळ  दिन कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. सिंह म्हणाले की, भारताचा अंतराळ कार्यक्रम हा केवळ रॉकेट्स आणि उपग्रहांपुरता मर्यादित नसून, सुरुवातीपासूनच तो लोकांना सक्षम करण्यासाठी, जीवनमान सुधारण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आहे.

राष्ट्रीय अंतराळ  दिन आपल्याला हे स्मरण करून देतो की भारताची सध्याची अवकाशातील कामगिरी हे अंतिम ध्येय नसून, ती एका मोठ्या दृष्टिकोनाकडे नेणारी पायरी आहे. जिथे विज्ञान, नवोन्मेष आणि लोककल्याण एकत्र येऊन राष्ट्राचे भविष्य घडवतात, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

इस्रोने भारतासाठी एक मौल्यवान संपत्ती निर्माण केली असून, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन प्रसन्न बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजीत कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप या गगनयान मोहिमेची तयारी करणाऱ्या चार अंतराळवीरांचा त्यांनी उल्लेख केला. 

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय कामकाजात अंतराळ  तंत्रज्ञानाच्या वापराचा विस्तार करण्याचे आवाहन केले होते, याची आठवण करून देताना डॉ. सिंह म्हणाले की, 2015 मध्ये अंतराळ  अनुप्रयोगांचे प्रमुख विकास कार्यक्रमांमध्ये एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनी पुढे सांगितले की, दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या   आयोजनापूर्वी जवळपास 300 विभागीय बैठका घेण्यात आल्या आणि सुमारे 90 दस्तऐवज तयार करण्यात आले, त्यांची एकत्रित आकडेवारी 5 हजाहून अधिक पानांची होती. यावर आधारित 15 वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात 100 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची कल्पना असून, त्यातील 70 टक्के छोटे उपग्रह असतील. हे ध्येय शासकीय तंत्रज्ञान मोहिमा आणि खासगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील मोहिमा यांच्या भागीदारीतून साध्य केले जाणार आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांच्या मते, हा आराखडा भारताच्या अंतराळ  प्रवासाला 2040 व त्यापुढील काळात दिशा देईल आणि अंतराळ  तंत्रज्ञानाचा उपयोग करून अन्न व जलसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील लवचिकता, पर्यावरणीय शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाद्वारे ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनाला बळकटी देईल.

या दृष्टिकोनाबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने एका परिवर्तनशील टप्प्यात प्रवेश केला आहे, जिथे तो आता केवळ प्रतीकात्मक कामगिरीपुरता मर्यादित राहिला नाही तर देशाची वैज्ञानिक प्रगती, तंत्रज्ञान  नवोन्मेष आणि लोक कल्याण यांमध्ये महत्त्वपूर्ण हातभार लावत आहे. या कार्यक्रमात, त्यांनी भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉन-2025 आणि इस्रो रोबोटिक्स चॅलेंज - यूआरएससी 2025 (आयआरओसी-यू 2025) जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले.

खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले केल्याने नवोन्मेष आणि उद्योजकतेची एक नवीन लाट आली आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. एकेकाळी केवळ सरकारी प्रकल्पांपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र आज शेकडो स्टार्टअप्सच्या माध्यमातून कार्यरत आहेत, जे अंतरग्रहीय संशोधनाबरोबरच दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहे, असे ते म्हणाले. अंतराळ तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनात शांतपणे प्रवेश केला आहे. आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचे निरीक्षण, स्मार्ट सिटी नियोजन, गृहनिर्माण कार्यक्रम तसेच ड्रोनद्वारे जमिनीच्या मालकीचे मॅपिंग यासारख्या प्रकल्पांना ते बळ देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्र्यांनी इस्रोच्या भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेषा देखील मांडली. 2025 ची सुरुवात NavIC च्या यशस्वी प्रक्षेपणाने झाली आणि त्यानंतर याच वर्षाच्या अखेरीस मानवी-रोबोट मोहीम ‘मिशन वायुमित्र’ होणार आहे, असे ते म्हणाले. 2027 मध्ये, गगनयान मोहिमेअंतर्गत भारत आपले पहिले मानवी अंतराळ उड्डाण करणार आहे. त्यानंतर 2028 मध्ये चंद्रमित्र मोहीम, चांद्रयान-4 , शुक्र ग्रह मोहीम आणि 2035 पर्यंत प्रस्तावित भारत अंतरिक्ष स्थानकाची स्थापना होईल, असे त्यांनी सांगितले. भारताने 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यामुळे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासावर प्रतीकात्मक शिक्कामोर्तब होणार आहे.

अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि गगनयान प्रकल्पाच्या तयारीसह आगामी इस्रो मोहिमांची माहिती उपस्थितांना दिली. हे उपक्रम भारताला भविष्यातील मानवी अंतराळ संशोधनात एक प्रमुख भागिदार म्हणून स्थान देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, यावर त्यांनी भर दिला.

***

सुषमा काणे/राज दळेकर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2160193)
Read this release in: Hindi , English , Urdu , Malayalam