संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलासाठी अपतटीय गस्ती करिता वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक जहाजांपैकी चौथ्या जहाजाचा प्लेट कटिंग समारंभ मुंबईत माझगाव गोदीत संपन्न

Posted On: 20 AUG 2025 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025

भारतीय तटरक्षक दलासाठी (आयसीजी) माझगाव डॉक जहाज बांधणी कंपनीतर्फे (एमडीएल) तयार करण्यात येत असलेल्या अपतटीय  गस्तीसाठी  वापरल्या जाणाऱ्या सहा अत्याधुनिक  जहाजांच्या मालिकेतील (एनजीओपीव्हीज) चौथ्या जहाजाचा प्लेट कटिंग समारंभ आज, 20 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत माझगाव गोदीत संपन्न झाला. संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीने संरचित, विकसित आणि निर्मित अशा या 117 मीटर लांबीच्या जहाजात 23 नॉटपर्यंतच्या वेगाने प्रवास करण्याची क्षमता असून त्याचा परिचालनात्मक पल्ला 5,000 सागरी  मैल इतका आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भविष्यवादी देखरेख प्रणाली, दूरस्थ पायलेटेड ड्रोन्स, एकात्मिक सेतू प्रणाली तसेच एकात्मिक मंच व्यवस्थापन यंत्रणेसह अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज असलेले हे एनजीओपीव्ही भारताच्या प्रचंड सागरी क्षेत्राचे संरक्षण करण्याच्या आयसीजीच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करेल. या जहाजामध्ये 11 अधिकारी आणि 110 कर्मचारी यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. ‘बाय (इंडियन आयडीडीएम)’ श्रेणींतर्गत दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी करार करण्यात आलेला हा एनजीओपीव्ही प्रकल्प सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी संपूर्णपणे जुळणारा आहे.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयसीजीच्या इस्टर्न सीबोर्ड मुख्यालयाचे उपमहासंचालक (तांत्रिक विभाग), महानिरीक्षक एनजी रवीन्द्रन यांनी भूषवले. एमडीएलचे कार्यकारी संचालक (जहाजबांधणी) ए.विनोद यांच्यासह आयसीजी तसेच एमडीएलमध्ये कार्यरत अनेक ज्येष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सागरी हिताचे अधिक परिणामकारक पद्धतीने संरक्षण करण्याच्या दृष्टीने भारतीय तटरक्षक दलाला जास्त सक्षम करणारा हा उपक्रम भारताच्या वाढत्या संरक्षण निर्मिती क्षमतेला अधोरेखित करतो.

‍निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2158564)
Read this release in: English , Urdu , Hindi