आयुष मंत्रालय
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने आयोजित केलेल्या बाल आरोग्य विषयावरील 30 व्या राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप
आयुर्वेदाची कुमारभृत्य ही बाल-संगोपन प्रणाली, 'निरोगी बालक, निरोगी भारत' घडवू शकते: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
आयुर्वेदाची प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनकारक आणि समग्र बाल-आरोग्य सेवेतील भूमिका हा परिसंवाद अधोरेखित करतो
कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असलेली भावी पिढी घडवण्यासाठी कुमारभृत्याचे आधुनिक आरोग्य प्रणालीसोबत अधिक एकत्रीकरण करण्याची तज्ञांची मागणी
Posted On:
20 AUG 2025 8:00AM by PIB Mumbai
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ(RAV) या आयुष मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेने 'बालकांमधील आजार आणि निरोगीपणाचे आयुर्वेदानुसार व्यवस्थापन' यावर आयोजित केलेल्या 30 व्या राष्ट्रीय परिसंवादाचा आज, नवी दिल्ली येथील स्कोप कॉम्प्लेक्स ऑडिटोरियम, लोधी रोड येथे समारोप झाला.
या दोन दिवसीय परिसंवादात (18-19 ऑगस्ट 2025) देशभरातून नामांकित आयुर्वेद विद्वान, संशोधक, चिकित्सक आणि विद्यार्थी यांच्यासह 500 हून अधिक जण सहभागी झाले. बालकांमधील आजारांचे व्यवस्थापन आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे या दोन्ही गोष्टींवर या परिसंवादात भर देण्यात आला, ज्यामुळे बाल-आरोग्यासाठी आयुर्वेदाचा समग्र दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लेखी संदेशाच्या माध्यमातून समारोपाचे भाषण केले. या परिसंवादाचे निष्कर्ष भारताच्या बाल-आरोग्य सेवा क्षेत्राला अधिक बळकटी देतील, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. ते म्हणाले, “आयुर्वेदाच्या कुमारभृत्य या शाखेमध्ये प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनपर आणि उपचारात्मक दृष्टिकोन एकत्र करून बाल-आरोग्य सेवेचा कायापालट करण्याची क्षमता आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकत्रितपणे झालेल्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीमुळे 'निरोगी बालक, निरोगी भारत' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन संशोधन आणि व्यावहारिक पद्धतींना प्रेरणा देईल.”
या परिसंवादाने आयुर्वेदातील बालआरोग्य विषयक शैक्षणिक आदानप्रदान प्रक्रियेत एक मापदंड स्थापन केला आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यावेळी म्हणाले. पुराव्यावर आधारित प्रमाणीकरणाचे महत्त्व अधोरेखित करुन त्यांनी आधुनिक आरोग्य पद्धती आणि आयुर्वेदातील तत्त्वे यांची सांगड घालण्यासाठी सहयोगी अध्ययनाची नितांत गरज असल्याचे सांगितले.
योगाभ्यास आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळवून दिल्याबद्दल वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने बालआरोग्य विषयक निरामयतेला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
पुढील पिढीतील आयुर्वेद तज्ज्ञ आणि संशोधकांना ज्ञानसमृद्ध करण्याविषयीची राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाची वचनबद्धता या परिसंवादाच्या यशस्वितेतून दिसून येते असे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या संचालक डॉ वंदना सिरोहा यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले. शास्त्रीय संशोधन निबंधांचे सादरीकरण आणि पोस्टर सादरीकरण यामध्ये सहभागी झालेल्या युवा प्रतिभावंतांनी आयुर्वेदातील बालआरोग्य क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र मांडले, असे त्या म्हणाल्या.
या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये खालील गोष्टींचा समावेश होता:
• आयुर्वेदातील बालआरोग्य विषयक 20 शास्त्रीय संशोधन निबंधांचे सादरीकरण.
• युवा तज्ञ आणि वैद्य यांचे पोस्टर सादरीकरण.
• बालकांमध्ये प्रतिबंधात्मक आणि संवर्धनात्मक आरोग्य सेवांवरील परस्परसंवादी सत्रे.
• स्मरणिकेचे प्रकाशन, परिसंवाद संच आणि सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण
भारतीय आरोग्यसेवा प्रणालीला पूरक म्हणून मुख्यत्वे जीवनशैलीमुळे उद्भवणारे विकार, पोषणमूल्यांची कमतरता आणि मुलांमधील नवनवीन आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी आयुर्वेदातील समग्र बालआरोग्य विषयक पद्धतींना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे यावर एकमताने परिसंवादाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाने समग्र बालआरोग्य विषयक चिकित्सापद्धतीचा पाया म्हणून आयुर्वेदाचे महत्त्व विषद केले तसेच राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सातत्याने ज्ञान सामायिक करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.



***
SonalTupe/ShaileshPatil/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158271)