संरक्षण मंत्रालय
भारत आणि श्रीलंका नौदलाच्या स्लीनेक्स-25 या संयुक्त नौदल सरावासाठी भारतीय नौदलाची जहाजे श्रीलंकेत दाखल
Posted On:
15 AUG 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
भारतीय नौदलाची आयएनएस राणा (क्षेपणास्त्र विनाशिका) आणि आयएनएस ज्योती (फ्लीट टँकर) ही जहाजे स्लीनेक्स-25 या श्रीलंका-भारत नौदल सरावाच्या 12 व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी कोलंबो येथे दाखल झाली आहेत. हा सराव 14 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणार आहे. 2005 मध्ये सुरू झालेला स्लीनेक्स हा द्विपक्षीय नौदल सराव गेल्या दोन दशकांपासून दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य अधिक मजबूत करत आहे. आंतर-परिचालनक्षमता, सागरी सहकार्य वाढवणे आणि विविध सागरी कारवाया संयुक्तपणे करताना सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे. स्लीनेक्स या युद्धसरावाची मागील आवृत्ती 17 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान भारतात विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती.स्लीनेक्स हा द्विपक्षीय नौदल सराव 2005 मध्ये दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
(2)V4SO.jpeg)
14 ते 16 ऑगस्ट 2025 या काळात कोलंबो येथे हार्बर फेज (बंदर टप्पा), त्यानंतर 17 ते 18 ऑगस्ट 2025 या काळात सी फेज (समुद्री टप्पा) अशा दोन टप्प्यांत या सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व SLNS गजबाहु आणि SLNS विजयबाहु (दोन्ही प्रगत ऑफशोअर गस्ती नौका) करतील आणि दोन्ही नौदलांची विशेष दलेही या सरावात सहभागी होतील.
(2)3HE1.jpeg)
हार्बर फेज दरम्यान, व्यावसायिक संवाद, विषयतज्ञांमध्ये विचारांची देवाणघेवाण (SMEE), सर्वोत्तम पद्धतींची परस्परांना माहिती देणे, सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण, तसेच योगाभ्यास सत्रांचे आणि क्रीडा कार्यक्रमांते आयोजन करण्यात आले आहे. यामुळे दोन्ही नौदलांमधील मैत्री आणि सौहार्दाचे संबंध अधिक दृढ होतील. सी फेज दरम्यान नियोजित नौदल कवायतींमध्ये सागरी लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी भडीमार, दळणवळण प्रोटोकॉल, नौकानयन, खलाशी कवायती, व्हिजिट बोर्ड सर्च अँड सीझर (VBSS) आणि समुद्रात इंधन भरणे यांचा समावेश आहे.
(2)C11N.jpeg)
स्लीनेक्स सागरी सराव हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सखोल सहकारी संबंधांचे प्रतीक आहे, ज्याने ‘महासागर’ (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या भारताच्या धोरणानुसार सागरी क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत केले आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157042)