संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या सामरिक स्वायत्ततेचे आणि संरक्षण स्वावलंबनाचे उदाहरण; पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्रतिपादन


“स्वदेशी शस्त्रांच्या क्षमतेमुळे भारत ठोस आणि स्वतंत्र कारवाई करण्यासाठी सक्षम”

भारतातच लढाउू विमानाचे इंजिन विकसित करण्याचे पंतप्रधानांचे भारतीय नवोन्मेषक, युवकांना आवाहन

Posted On: 15 AUG 2025 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरला भारताच्या सामरिक स्वायत्ततेचा आणि संरक्षण स्वावलंबनाचा प्रत्यय म्हणून गौरवले. 15 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानातील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधा भारतीय बनावटीच्या शस्त्रांचा वापर करून नष्ट केल्या. याबरोबर सुरू झालेल्या नव्या पर्वात भारत आण्विक हल्ल्याच्या धमक्यांना घाबरणार नाही किंवा अटींशर्तींसह परराष्ट्रांच्या कोणत्याही धमक्या स्वीकारणार नाही.

अशा धमक्यांना ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी सामरिक स्वायत्तता आणि स्वदेशी क्षमता अत्यावश्यक आहे, स्वावलंबन हे राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा पाया आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतात निर्मिती केलेल्या शस्त्रांच्या या स्वदेशी क्षमतेमुळे भारताला ठाम आणि स्वतंत्र कारवाई करण्यास सक्षम बनवले; यावरून आता हे सिद्ध झाले की , राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारत परराष्ट्रांवर अवलंबून राहण्‍याची आवश्‍यकता नाही.”

सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर यावेळी पंतप्रधानांनी ठाम भूमिका मांडली, “भारताने आता ठरवले आहे – रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. जनतेला कळले आहे की सिंधू जल करार अन्यायकारक होता. सिंधूच्या खोऱ्यातील पाणी शत्रूच्या जमिनींना जात होते आणि आपले शेतकरी पाणी टंचाईने त्रस्त होते.” या विधानाने हे अधोरेखित होते की, भारत आपल्या राष्ट्रीय हिताबाबत तडजोड करणार नाही. तसेच, सिंदूर मोहिमेतून देशाची स्वदेशी तंत्रज्ञान आणि संरक्षण साधनांवर आधारित वेगवान आणि ठोस कारवाईची क्षमता सिद्ध झाली.

'आत्मनिर्भर भारत' हा 'विकसित भारता'च्या पायाभूत स्तंभांपैकी एक असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, “दुसऱ्यांवर अवलंबित्व हे राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते, परावलंबित्व ही धोकादायक सवय दुर्दैवी ठरते. म्हणूनच आपण जागरूक आणि स्वावलंबी होण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे. स्वावलंबन हे फक्त निर्यात, आयात, रुपये किंवा डॉलर यापुरते मर्यादित नाही, ते आपल्या क्षमतांविषयी, स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या सामर्थ्याविषयी आहे.”

पंतप्रधानांनी भारतीय नवोन्मेषक आणि युवकांना भारतातच लढाउू विमान इंजिन विकसित करण्याचे आवाहन केले. भविष्यातील संपूर्णपणे स्वदेशी आणि स्वावलंबी संरक्षण तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर देताना ते म्हणाले, “आपण कोविड काळात लस तयार केली, यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंटची व्यवस्था केली, तशी आपली स्वतःची जेट इंजिनेसुद्धा तयार करायला हवीत. आपल्या वैज्ञानिकांनी आणि युवकांनी हे थेट आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे.”

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करताना पंतप्रधान मोदी यांनी भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची योजना जाहीर केली, ज्यामुळे अंतराळ क्षमतांच्या स्वदेशी पर्वाची सुरुवात होईल. त्यांनी सांगितले की, 300 हून अधिक स्टार्ट-अप्स उपग्रह, शोध मोहीम आणि अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात सक्रियपणे नवोन्मेष करत आहेत. तेव्हा जागतिक स्तरावर अंतराळ विज्ञान आणि शोध मोहिमेत भारत केवळ सहभागी नाही तर आघाडीवर आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला “उत्कृष्ट आणि प्रेरणादायी” असे म्हटले आहे. समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील संदेशात संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात भारताच्या प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मार्गदर्शक नकाशा मांडला, देशाने गाठलेले महत्वपूर्ण टप्पे आणि आगामी संधी स्पष्ट केल्या.

 

 

* * *

सुवर्णा बेडेकर/रेश्‍मा बेडेकर/दर्शना राणे


(Release ID: 2156905)