नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक 2025 च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जेएनपीए येथे ‘हरित आणि डिजिटल सागरी कॉरिडॉर संवाद’ चे आयोजन


“हरित आणि डिजिटल कॉरिडॉर हे आर्थिक विकास, नवोन्मेष आणि शाश्वततेचे इंजिन आहेत:” सर्वानंद सोनोवाल

“वाढवण बंदर त्याच्या परिचालनाच्या पहिल्या दिवसापासूनच जगातील आघाडीच्या 10 बंदरांमध्ये स्थान मिळविण्यास सज्ज आहे:” देवेंद्र फडणवीस

“हरित आणि डिजिटल नौवहनातील भारत-सिंगापूर भागीदारी ही जागतिक सहकार्याचे एक मॉडेल आहे:” गन किम योंग

Posted On: 12 AUG 2025 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

 

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या  अंतर्गत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) आणि भारतीय बंदरे संघटना (IPA) यांनी आज मुंबईत "हरित आणि डिजिटल सागरी कॉरिडॉरबाबत  नेत्यांचा संवाद" आयोजित केला. हा कार्यक्रम ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीकच्या पूर्वतयारीचा भाग होता. या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय मान्यवर, उद्योग धुरीण, भारत आणि परदेशातील प्रमुख सागरी भागीदारांसह 300 हून अधिक प्रतिनिधी एकत्र आले होते.

एका व्हिडिओ संदेशात, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, "आपले पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सिंगापूरसोबतचे आपले द्विपक्षीय संबंध विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. भारत-सिंगापूर हरित आणि  डिजिटल नौवहन  कॉरिडॉर कमी उत्सर्जन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास गती देईल, डिजिटल साधने मजबूत करेल आणि सागरी परिचालनात  परिवर्तन घडवून आणेल."

हे कॉरिडॉर केवळ व्यापार मार्ग नाहीत तर आर्थिक, हरित आणि डिजिटल पायवाट आहेत जे जागतिक व्यापार गतिशीलतेला नव्याने  परिभाषित करतील."

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2029, 2035,आणि 2047 पर्यंतच्या उद्दिष्टांसह महाराष्ट्राचा सागरी आराखडा अधोरेखित केला आणि सांगितले की, "वाढवण बंदर हे परिचालनाच्या पहिल्या दिवसापासूनच जागतिक स्तरावरील आघाडीच्या दहा  बंदरांमध्ये स्थान मिळविण्यास सज्ज आहे, जे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांच्या परिसंस्थेत परिवर्तन घडवून आणेल."

सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांनी 60 वर्षांच्या भारत-सिंगापूर भागीदारीची प्रशंसा केली  आणि नमूद केले की, "हरित नौवहन , नवीकरणीय ऊर्जा आणि सागरी नवोन्मेषातील  आमचे सहकार्य शाश्वत भविष्याप्रति संक्रमणाला गती देईल." सिंगापूरचे प्रभारी  वाहतूक मंत्री जेफ्री सिओ म्हणाले, "भारत आणि सिंगापूर हे सागरी क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये पूर्ण होणाऱ्या हरित आणि डिजिटल सागरी संचारमार्गाबाबतचा आगामी सामंजस्य करार तंत्रज्ञान आणि शाश्वततेवरील संयुक्त कार्यासाठी एक मजबूत व्यासपीठ प्रदान करेल.”

या मेळाव्याला संबोधित करताना, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे  सचिव टी के रामचंद्रन यांनी व्यापार, सागरी प्रशासन आणि प्रादेशिक एकात्मतेला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संचारमार्गाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्ग  (आयएमईईसी), आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग (आयएनएसटीसी) आणि पूर्व सागरी मार्ग (ईएमसी) ही "वाढीची इंजिने आहेत, जी जागतिक एकात्मता आणि शाश्वत विकासाला चालना देतात." त्यांनी पुढे सांगितले की मार्च 2025 मध्ये इरादापत्राद्वारे औपचारिकरित्या मंजूर झालेला भारत-सिंगापूर हरित आणि डिजिटल नौवहन  मार्ग स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट दळणवळण आणि डिजिटल नवोन्मेष या दोन्ही राष्ट्रांच्या प्राधान्यांशी सुसंगत आहे.

भारताच्या सागरी क्षमता, नवोन्मेष, धोरणात्मक दृष्टिकोन आणि जागतिक भागीदारी प्रदर्शित करण्यासाठी मंत्रालयाचे प्रमुख व्यासपीठ म्हणून आयएमडब्ल्यू 2025 बद्दल माहिती देताना  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे   सहसचिव आर लक्ष्मणन म्हणाले, "महासागरांना एकत्र आणणे, एक सागरी दृष्टिकोन, हे केवळ एक घोषवाक्य नसून सध्याच्या भू-राजकीय वातावरणात जगातील सागरी भागधारकांना एकत्र आणण्याची आमची वचनबद्धता आहे.”

जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे सीएमडी उन्मेष शरद वाघ यांनी आपल्या स्वागतपर भाषणात भारताच्या सागरी दृष्टिकोनाला चालना देण्यात जेएनपीएच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला आणि "अधिक हरित, स्मार्ट आणि अधिक जोडलेले संचारमार्ग निर्माण करण्यासाठी उपाय निश्चित करण्याचे आवाहन केले. दिवसभर चाललेल्या या संवादात सागरी सुधारणा, पायाभूत सुविधांवरील उपलब्धी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर सत्रे होती, त्यानंतर लवचिक आणि शाश्वत सागरी आर्थिक कॉरिडॉरवर पॅनेल चर्चा झाली.

इंडिया मेरीटाईम वीक अर्थात भारत सागरी सप्ताह 2025 मध्ये जागतिक आणि देशांतर्गत भागधारकांना आमंत्रित केले बोलावले जाईल जेणेकरून ते सागरी अमृतकाल व्हिजन 2047 मध्ये योगदान देणाऱ्या नवोन्मेष, धोरणात्मक संवाद आणि गुंतवणुकीला चालना देतील. 

भारत-सिंगापूर हरित आणि डिजिटल नौवहन मार्गाला पुढे नेण्याच्या सामायिक वचनबद्धतेसह नेत्यांमधील संवादाचा समारोप झाला. या कार्यक्रमाला उद्योग भागीदार म्हणून असोचॅम आणि ज्ञान भागीदार म्हणून ग्रँट थॉर्नटन भारत एलएलपी यांनी सहाय्य केले.

येत्या  27   ऑक्टोबर ते  31  ऑक्टोबर 2025   दरम्यान इंडिया मेरीटाईम वीक, 2025 गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी, कृपया  www.imw.org.in ला भेट द्या.

 

* * *

सोनाली काकडे/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155868)
Read this release in: English , Urdu , Hindi