संरक्षण मंत्रालय
बंगळूरुतील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. इथे 16 व्या एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे स्मृती व्याख्यानाचे आयोजन
Posted On:
09 AUG 2025 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025
बंगळूरु इथल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) व्यवस्थापन अकादमी सभागृहात आज दि. 09 ऑगस्ट 2025 रोजी 16 व्या एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे स्मृती व्याख्यानाचे आयोजन केले गेले. भारतीय हवाई दल संघटनेच्या, कर्नाटक शाखेने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि., बंगळूरुच्या सहकार्याने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे यांचा चिरस्थायी वारसा आणि भारतीय हवाई क्षेत्रावरच्या त्यांच्या चिरस्थायी प्रभावाचे स्मरण करणे हा या व्याख्यानाच्या आयोजनाचा उद्देश होता. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भारतीय हवाई दल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि., संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि संबंधित एरोस्पेस उद्योग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

विमान आणि प्रणाली चाचणी आस्थापनेच्या अखत्यारीतील हवाई दलाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी (एअर फोर्स स्कूल, एएसटीई) सादर केलेल्या प्रार्थनेने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. हवाई दल संघटनेचे अध्यक्ष, एअर मार्शल एच. बी. राजाराम (निवृत्त) यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि या व्याख्यानमालेच्या प्रारंभ झाल्यापासूनच्या वाटचालीबद्दलची माहिती दिली. दिवंगत एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे यांनी भारतीय हवाई दल आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मधील चार दशकांच्या अभिमानास्पद कारकिर्दीत भारतीय लष्करी विमान वाहतुकीच्या विकासासाठी दिलेल्या महत्त्वाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनीही उपस्थितांसोबत संवाद साधला. त्यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. आणि भारतीय हवाई दलाच्या विस्तारत चाललेल्या भागीदारीविषयी सांगितले. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह, यांनी बीजभाषण केले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाची त्यांनी प्रशंसा केली. आधुनिक लष्करी संघर्षांमध्ये हवाई सामर्थ्याचे महत्त्व आणि राष्ट्रीय सुरक्षेतील त्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. लष्करी आणि राजकीय नेतृत्वामधील ताळमेळ तसेच सशस्त्र दलांना दिलेले पूर्ण स्वातंत्र्य या ऑपरेशन सिंदूरच्या यशामागच्या दोन प्रमुख गोष्टी असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्राथमिक टप्प्यावर प्रतिसाद देणारी आणि प्रतिबंधक यंत्रणा म्हणून हवाई सामर्थ्याची निर्णायक भूमिका त्यांनी आपल्या भाषणातून मांडली. भविष्यातील क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी स्वदेशीकरण, संशोधन आणि विकास, एकता आणि परस्पर सहकार्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 16 व्या काट्रे स्मृती व्याख्यानानिमित्त एक स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली. यावेळी हवाई दल प्रमुखांच्या हस्ते एअर कमोडोर चंद्रशेखर (निवृत्त) यांचाही सत्कार करण्यात आला. भारतीय हवाई दल संघटनेच्या कर्नाटक शाखेचे उपाध्यक्ष, एअर कमोडोर ए. के. पात्रा (निवृत्त) यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154773)