राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झारखंडमधील देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
Posted On:
31 JUL 2025 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (31 जुलै 2025) झारखंडमधील देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेअंतर्गत प्रामुख्याने तृतीयक आरोग्यसेवांवर भर दिला गेला असला तरी, या संस्थेने प्राथमिक आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही सक्रिय मार्गदर्शन आणि सहकार्य पुरवले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केली. प्राथमिक सेवा हा सार्वत्रिक आरोग्य विषयक संरक्षण कवचाचा आधार आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या चमूने शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण सामुदायिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मदत करावी, असे त्या म्हणाल्या.डॉक्टरांनी व्यक्तिगत पातळीवरही सर्वसमावेशक आरोग्यसेवा हे तत्त्व अंगिकारावे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय पातळीवर, सरकार जनतेवरचा आरोग्याशी संबंधित खर्चाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
आपल्या देशाला आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करायची आहेत. ही राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्यसेवांमध्ये असलेली विषमता दूर करण्यासाठी स्थापन केलेल्या देवघर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसारख्या वैद्यकीय संस्था म्हणजे अंधःकारात प्रकाश निर्माण पसरवणारे दीपस्तंभ आहेत. या संस्थांनी कमी खर्चात जागतिक दर्जाची तज्ञता असलेली वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासोबतच, आरोग्यसेवा विषयक परिसंस्थेत बदल घडवून आणणारे घटक म्हणूनही भूमिका बजावायची आहे असे आवाहन त्यांनी केले.




सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150929)