संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीकडून संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 13 व्या बैठकीत संरक्षण भागीदारी आणखी मजबूत करण्याप्रती वचनबद्धता व्यक्त

Posted On: 30 JUL 2025 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

भारत आणि संयुक्त अरब अमीरातीने (युएई) भारत युएई संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या (जेडीसीसी) 30 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली इथे झालेल्या 13 व्या बैठकीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्याबाबतची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह प्रथमच सचिव स्तरावर झालेल्या या बैठकीचे सहअध्यक्ष होते. दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर असलेल्या उच्च स्तरीय संरक्षण शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेले युएईचे संरक्षण सचिव लेफ्टनंट जनरल इब्राहिम नासिर एम. अल अलावी हेदेखील बैठकीचे सहअध्यक्ष होते.व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक संबंध यासारख्या क्षेत्राततील वाढत्या संबंधांप्रमाणेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.

लष्करी प्रशिक्षण सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांनी मंजूरी दिली व आपापल्या प्रशिक्षण गरजांबाबत चर्चा केली. भारताने युएइच्या गरजांनुसार आखण्यात आलेले प्रशिक्षण अभ्यासक्रम पुरविण्याची तयारी दाखविली. वेळेत माहितीचे आदानप्रदान करुन सागरी सुरक्षेमध्ये सहकार्य करण्यासाठीदेखील दोन्ही देशांनी मंजूरी दिली. 

संरक्षण सहकार्याच्या नव्या पैलूंबाबत विचार करण्यासाठी, दोन्ही देशांनी प्रशिक्षण सहकार्य, संरक्षण उद्योग भागीदारी याविषयी विचारविनिमय केला. छोट्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादनासाठीच्या ICOMM (भारत) आणि CARACAL (युएई) यांच्यातील सहकार्यासारखे अन्य संयुक्त उत्पादन उपक्रमांचा पाठपुरावा करण्याबाबतही दोन्ही देशांचे एकमत झाले. कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या उदयोन्मुख क्षेत्रातील अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे विकास करण्याच्या शक्यतेविषयी चर्चा करण्यात आली. तसेच जहाजबांधणीतील संधी, पुनर्बांधणी, सुधारणा व सामायिक  मंचांची देखभाल याविषयीदेखील चर्चा करण्यात आली.

भारतीय तटरक्षक दल आणि युएइ राष्ट्रीय सुरक्षा दल यांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. शोध व बचाव कार्य, प्रदूषण प्रतिसाद, चाचेगिरी रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्याबाबतचा आराखडा तयार करण्याविषयीचा हा सामंजस्य करार आहे.

  

जेडीसीसीच्या अनुषंगाने भारत व युएई यांनी दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान 4 थी, नौदलांदरम्यान 9 वी आणि हवाई दलांदरम्यान पहिली चर्चा 28-29 जुलै 2025 रोजी आयोजित केली होती. लष्करी सराव, प्रशिक्षण व गरजेनुसार तज्ज्ञांचे आदानप्रदान या मुद्द्यांवर चर्चेत भर देण्यात आला. 

भारत आणि युएई यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत असून सतत वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015 मधील युएइ दौऱ्यादरम्यान या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा  पाया रचला गेला. नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या दुबई एअर शोमधील भारताचा सहभाग ही भागीदारी आणखी मजबूत करेल.

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150488)
Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam