अणुऊर्जा विभाग
टेमा (TEMA) इंडिया लिमिटेड या कंपनीने ‘डीप्लिटेड हेवी वॉटर’ (कमी तीव्रतेचे जड पाणी) चा दर्जा उंचावण्यासाठी देशातील पहिली खासगी चाचणी सुविधा केली सुरू
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) यांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणावर आधारीत आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या खरेदी मागणीनुसार तयार करण्यात आलेली ही सुविधा म्हणजे भारतातील अणुक्षेत्रात स्वावलंबन (आत्मनिर्भर भारत) साध्य करण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल
Posted On:
26 JUL 2025 4:58PM by PIB Mumbai

डावीकडून उजवीकडे : चेतन दोशी (संचालक, टीईएमए), के. टी. शेणॉय (संचालक, बीएआरसी-बार्क), राजेश व्ही. (तांत्रिक संचालक, एनपीसीआयएल), हरेश के. सिप्पी (मुख्य व्यवस्थापकीय संचालक-सीएमडी, टीईएमए), नरेंद्र राव (संचालक, टीईएमए)
भारताच्या अणुक्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एनपीसीआयएलचे तांत्रिक संचालक श्री. राजेश व्ही. आणि बार्कच्या रसायन अभियांत्रिकी समुहाचे संचालक श्री. के. टी. शेणॉय यांनी देशातील ‘डीप्लिटेड हेवी वॉटर’ या कमी तीव्रतेच्या जड पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठीच्या पहिल्या खासगी चाचणी सुविधेचे उद्घाटन केले. टीईएमए इंडिया लि. ने ही सुविधा उभारली आहे. भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) यांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणावर आधारीत आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या खरेदी मागणीनुसार, टीईएमए इंडियाच्या अणू विभागाने रचना आणि निर्मिती केलेली ही सुविधा म्हणजे खासगी क्षेत्रात प्रथमच साकारण्यात आलेली ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. ही घडामोड पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाशी ठोस सुसंगत आहे.

आत्तापर्यंत जड पाण्यातून ड्युटेरियमचे प्रमाण कमी करुन (depletion) शुद्धीकरणाच्या (डिस्टिलेशन) प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची चाचणी सुविधा फक्त बार्कमध्येच अस्तित्वात होती. कार्यक्रमात बोलताना, श्री. राजेश व्ही. आणि श्री. के. टी. शेणॉय यांनी टीईएमए इंडियाच्या तांत्रिक कौशल्याचे, दर्जाप्रती बांधिलकीचे आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील विश्वासार्ह भागीदार म्हणून वाढत्या भूमिकेचे कौतुक केले.
आठ शुद्धीकरण स्तंभांचा पहिला अधिकृत संच, मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला. या संचामध्ये विशेष प्रक्रिया केलेल्या फॉस्फर ब्रॉन्झ या धातू घटकांचा समावेश असतो. हे, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स-PHWRs, या जड पाण्यावर चालणाऱ्या उच्च दाबाच्या अणुभट्ट्यांसाठी साठी महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक कठोर अंतर्गत चाचण्या (In-house Performance Testing) पूर्ण केल्यानंतर, RAPP युनिट 8, GHAVP युनिट्स 1–4 आणि KAIGA युनिट्स 5 आणि 6 या महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरासाठी सज्ज आहेत.
उच्च-तंत्रज्ञान आणि धोरणात्मक क्षेत्रांत अधिक स्वावलंबनाचा आग्रह धरणारा हा उपक्रम आत्मनिर्भर भारत या भावनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अणु उपकरणांची रचना, उत्पादन आणि पडताळणी पूर्णपणे देशांतर्गत स्तरावर केल्याने, भारताचे, आयात केलेली उपकरणे आणि बाह्य चाचणी सुविधा यांच्यावरील अवलंबित्व कमी होते. यामुळे देशांतर्गत क्षमता, आत्मविश्वास आणि स्थानिक उत्पादन क्षमता वाढवणे अर्थात दीर्घकालीन लवचिकता निर्माण होण्यास मदत होते आणि भारतीय कंपन्या राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात.
या कार्यक्रमात पारंपरिक पूजा, वृक्षारोपण आणि पहिल्या संचाच्या पाठवणीचा (shipment) औपचारिक सोहळा यांचा समावेश होता. या उपक्रमातून, भारताच्या खासगी क्षेत्राने प्रगत अणुउपकरणांच्या तपासणीच्या क्षेत्रात केलेल्या प्रवेशाचे प्रतीकात्मक दर्शन घडले.

हा उपक्रम, NPCIL आणि BARC सारख्या संस्थांबरोबरच्या सार्वजनिक-खासगी सहकार्याच्या एका नव्या युगाचे प्रतीक आहे, जिथे परस्परपूरक ताकदींचा उपयोग करून भारताच्या ऊर्जा भवितव्याचा विकास केला जात आहे.
***
माधुरी पांगे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148921)