आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
प्रमुख संसर्गजन्य रोगांचे उच्चाटन आणि नियंत्रण याबाबत भारताने केलेल्या कामगिरीची अद्ययावत माहिती
Posted On:
22 JUL 2025 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2025
भारत सरकारने प्रमुख संसर्गजन्य रोगांचे उच्चाटन आणि नियंत्रण याबाबत लक्षणीय कामगिरी केली आहे. यात पुढील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा समावेश आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग (टीबी) अहवाल 2024 नुसार देशात क्षयरोगाचा (टीबी) प्रादुर्भाव दर 2015 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 237 होता, तो 2023 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 195 इतका कमी झाला आहे. हा दर जागतिक पातळीवर जी घट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे. तर क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 21.4% घट झाली आहे. हे प्रमाण 2015 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 28 होते ते कमी होऊन 2023 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 22 झाले आहे.
- देशात मलेरियाच्या प्रादुर्भावात 2015 ते 2024 या कालावधीत 78.1% घट झाली असून मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात 77.6%घट झाली आहे. एपीआय निर्देशांक 2015 मधील 0.92 च्या तुलनेत 2024 मध्ये 0.18 वर आला आहे.
- वर्ष 2023 मध्ये काळा आजार ग्रस्त राज्यांच्या 54 जिल्ह्यांमधील 633 तालुक्यांमध्ये 10,000 लोकसंख्येपैकी एका पेक्षा कमी, असे या आजार निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. 2030 जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत निर्धारित लक्ष्यपूर्तीच्या मुदतीआधी भारताने ही कामगिरी साध्य केली असून आजही ही स्थिती कायम आहे.
- जपानी मेंदूज्वराच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण (सीएफआर ) 2014 मध्ये 17.6% होते ते 2024 मध्ये 7.1% पर्यंत कमी झाले आहे.
- वर्ष 2008 पासून डेंग्यूमुळे होणारा मृत्यूदर (प्रति 100 रुग्णांमागे मृत्यू) 1% पेक्षा कमी आहे (2024 मध्ये 0.13%).
- हत्तीरोगाने ग्रस्त 348 जिल्ह्यांपैकी 143 (41%) जिल्ह्यांनी सामुहिक औषधोपचार थांबवले आहे आणि प्रसार पडताळणी सर्वेक्षणला (टीएएस 1)मंजुरी दिली आहे, जे 2014 मध्ये 15% होते. सामुहिक औषधोपचाराची व्याप्ती एकूण लोकसंख्येच्या 2014 मधील 75%वरून 2025 मध्ये 85% वर पोहोचली आहे.
- एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (आयडीएसपी) अंतर्गत एकात्मिक आरोग्य माहिती मंचाच्या माध्यमातून (आयएचआयपी) कागदविरहित, प्रकरण-आधारित नोंदीद्वारे 50 हून अधिक साथीच्या आजारांचे निरीक्षण केले जाते.
- वर्ष 2010 ते 2024 दरम्यान एचआयव्हीचे व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे मातेपासून बाळाला होणाऱ्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये जवळपास 84% ने घट झाली आहे. तर याच कालावधीतील जागतिक पातळीवरील सुमारे 56.5% च्या तुलनेत व्हर्टिकल ट्रान्समिशन दर सुमारे 74.5% ने कमी झाला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2146984)