जलशक्ती मंत्रालय
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2025 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसजी) 2025 खालील स्तरावर करणे नियोजित आहे –
1.राज्ये / केंद्रशासित प्रदेश – 34
2.जिल्हे – 761
3.गावे – 21,000
एसएसजी 2025 अंतर्गत गावे, जिल्हे आणि राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांचे खालील मानके आणि कार्यपद्धतीनुसार मूल्यांकन करण्यासाठी एकूण 1000 गुणांची खालीलप्रमाणे विभागणी करण्यात येईल.
· सेवा स्तरावरील प्रगती – 240 गुण (30 टक्के)
· गावांमधील स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 540 गुण (40 टक्के)
· प्रकल्पांच्या कार्यक्षमतेची थेट पाहणी – 120 गुण (20 टक्के)
· नागरिकांच्या प्रतिक्रिया – 100 गुण (10 टक्के)
एका स्वतंत्र सर्वेक्षण एजन्सीकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ केले जाणार असून स्वच्छतेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक मानकांनुसार सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना राष्ट्रीय गुणानुक्रम दिले जाणार आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरांवरील कार्यशाळांमधून तसेच समाज माध्यमांद्वारे एसएसजी 2025 बाबतची माहिती प्रसारित केली गेली आहे. नागरिकांना स्वच्छतेबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदवता याव्यात यासाठी नागरिक प्रतिक्रिया अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अर्जाद्वारे नागरिकांच्या स्वच्छतेच्या विविध मानकांवर आधारित प्रतिक्रिया संकलित केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील नागरिकांचा सहभाग असेल याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष गावागावांत होणाऱ्या पाहणीतून मिळणारी माहिती संकलित करताना त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणालीमध्ये ‘जिओ फेन्सिंग’ म्हणजेच आभासी सीमारेषेचा समावेश करण्यात आला आहे तसेच स्थावर मालमत्तेचे जिओ टॅगिंग केले जात आहे. यामुळे संकलित केलेल्या माहितीची गुणवत्ता सुनिश्चित होईल. एसएसजी 2025 या पोर्टलद्वारे या सर्वेक्षणाची देखरेख केली जात आहे. थेट जागेवरील सर्वेक्षणातील माहितीची पुनःपडताळणी, क्षेत्रिय माहिती संकलनाच्या दैनंदिन प्रगतीची दररोज देखरेख आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांची दररोज तपासणी यांचा सर्वेक्षणात समावेश आहे.
जल शक्ती राज्यमंत्री व्ही.सोमण्णा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2146513)
आगंतुक पटल : 43