युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खेलो भारत परिषदेत, क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी 2036 ऑलिम्पिकसाठी भारताच्या पदक रणनीतीची रूपरेषा मांडली

Posted On: 17 JUL 2025 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2025

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी गुरुवारी खेलो भारत परिषदेत 2036 उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकमध्ये अव्वल 10 देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या भारताच्या रणनीतीची रूपरेषा मांडली. या एक दिवसीय परिषदेत भारतीय ऑलिंपिक संघटना, भारतीय पॅरालिंपिक समिती, राष्ट्रीय क्रीडा महासंघ, आघाडीच्या क्रीडा संस्था, प्रमुख कॉर्पोरेट हाऊसेसच्या प्रमुख भागधारकांसह भारतीय क्रीडा परिसंस्थेतील मान्यवर एकत्र आले, आणि त्यांनी 2047 साला पर्यंत भारताला जागतिक क्रीडा महाशक्ती म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी  पथदर्शक आराखडा तयार करण्यावर विचारमंथन केले.

खेलो भारत परिषदेच्या परस्परसंवादी सत्रात, खेलो भारत नीती 2025 (क्रीडा धोरण) मधील महत्वाच्या पैलूंवर चर्चा झाली. यावेळी सुशासनाचे महत्त्व आणि 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणारे आगामी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, यावर सखोल चर्चा झाली.

खेलो भारत नीतीच्या केंद्रस्थानी खेळाडू आहेत, 2036 उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिल्या 10 देशांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघ, राज्य सरकारे आणि कॉर्पोरेट हाऊसेसनी कशी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी, हे सरकारने अधोरेखित केले आहे.

डॉ. मांडवीय म्हणाले: "क्रीडा ही एक जन चळवळ आहे.आपण ध्येय ठरवू शकतो आणि आपण सर्वांनी एकत्र येऊनच ते साध्य करू शकतो." 

सहा तास चाललेल्या खेलो भारत परिषदेत सहभागी झालेल्या भागधारकांनी सरकारचे धोरण महत्त्वाकांक्षी असून क्रीडा क्षेत्रात जागतिक दर्जा सिद्ध करण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले. या परिषदेत चार प्रभावी सादरीकरणे होती. प्रत्येक सादरीकरणानंतर परस्परसंवादी सत्रे झाली, त्यावर अनेक भागधारकांनी सूचना दिल्या, आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे म्हणाल्या की, भारतीय क्रीडा क्षेत्रासमोरील 'वास्तव परिस्थिती' आणि 'आव्हाने' यांचा अभ्यास करून खेलो भारत नीतीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. प्रमुख भागधारकांशी प्रदीर्घ चर्चेनंतर अनेक सुधारणा करण्यात आलेल्या या दस्तऐवजाचा आराखडा तयार करण्यासाठी सरकारला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला. "आता आपल्याकडे खेळांना चालना देण्याची संधी आहे आणि या एकात्मिक धोरणाचा वापर करून, भारत मनोरंजनाच्या जगात चमकू शकतो, रोजगार देऊ शकतो आणि भारतातील तरुणांना खऱ्या अर्थाने दिशा देऊ शकतो," त्या म्हणाल्या.

डॉ.मांडवीय यांनी राष्ट्रीय क्रीडा महासंघांकडे पुढाकार घेण्याची आणि युद्धपातळीवर सुशासन प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी सोपवली.

“खेलो भारत नीती'च्या अंमलबजावणीचे यश आपण किती चांगल्या प्रकारे उपक्रम राबवतो यावर अवलंबून आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सर्वतोपरी मदत करण्यात आम्हाला आनंद वाटत आहे, मात्र भविष्यात कामगिरीवर आधारित अनुदानाचाही आम्ही विचार करू. यामुळे आपण नियोजन आणि खेळांचे आयोजन करण्यावर कसे गांभीर्याने लक्ष केंद्रित करत आहोत, याची खात्री पटेल,” मांडवीय म्हणाले. क्रीडापटूंना लॉजिस्टिक समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी मंत्रालयाने एनएसएफना कार्यक्रमांचे योग्य वेळापत्रक तयार करण्याचे आवाहन केले.

डॉ. मांडवीय यांनी यावेळी राष्ट्रउभारणीत राज्यांच्या भूमिकेवर भर दिला.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/‍प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2145674) Visitor Counter : 5