महिला आणि बालविकास मंत्रालय
दत्तक विषयक केंद्रीय प्राधिकरणाने दत्तक प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवरील समुपदेशन सेवा बळकट करण्याचे राज्यांना दिले निर्देश
Posted On:
17 JUL 2025 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रिय दत्तक प्रक्रिया संसाधन प्राधिकरणाने (कारा) सर्व राज्य दत्तक प्रक्रिया संसाधन संस्थांसाठी व्यापक आदेश जारी केले आहेत. दत्तक प्रक्रियेतील दत्तकपूर्व, दत्तक प्रक्रियेदरम्यानच्या आणि दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या अशा सर्व टप्प्यांवरील संरचित समुपदेशन सेवांचे बळकटीकरण व नियमितीकरण करण्याबाबतचे हे आदेश आहेत.
दत्तक प्रक्रियेतील सर्व संबंधित घटकांना देण्यात येणारी मनोसामाजिक मदत आणखी सक्षम करणे हा आदेश जारी करण्यामागील उद्देश आहे. दत्तक घेणारे पालक, दत्तक घेतलेली बालके आणि आपल्या मुलांना दत्तक देण्यासाठी तयार झालेले जन्मदाते पालक या सर्वांच्या समुपदेशनाचा यामध्ये समावेश आहे. समुपदेशन हा दत्तक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. दत्तक प्रक्रियेत समाविष्ट बालके आणि त्यांच्या पालकांच्या भावनिक तयारीसाठी, दत्तक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी तसेच दोघांच्याही कल्याणाच्या दृष्टीने समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कारा ने म्हटले आहे. 7 जुलै 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या निवेदनात रचनात्मक व गरजेनुसार देण्यात येणाऱ्या समुपदेशन सेवांचे अनिवार्य स्वरुप पुन्हा सांगण्यात आले आहे. दत्तक नियमावली 2022 मधील विविध तरतूदींनुसार हे स्वरुप ठरविण्यात आले आहे.
या आदेशानुसार जिल्हा व राज्य स्तरावर योग्य अर्हताप्राप्त समुपदेशक अथवा समुदेशकांची समिती नेमण्याच्या सूचना राज्य दत्तक प्रक्रिया संसाधन संस्थांना देण्यात आल्या आहेत. या समुपदेशकांकडे बाल मानसशास्त्र, मानसिक आरोग्य यामधील प्रशिक्षण किंवा समाज कार्याचा अनुभव असला पाहिजे. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांचे घर तपासणी अहवाल प्रक्रियेदरम्यान, नियम 10(7) नुसार दत्तकपूर्व समुपदेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच थोड्या मोठ्या मुलांचे नियम 30(4)(सी) अनुसार दत्तकपूर्व आणि दत्तक प्रक्रियेदरम्यान समुपदेशन करणे आवश्यक आहे.
विशिष्ट परिस्थितीत दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरचे समुपदेशन करावे असे सांगण्यात आले आहे. दत्तक बालकाने आपल्या मूळ मातापित्यांचा शोध घेणे सुरू केल्यास, दत्तक मूल व संबंधित कुटुंबाला एकमेकांशी जुळवून घेणे जमत नसल्यास किंवा दत्तक प्रक्रियेत कोणतीही अडचण अथवा व्यत्यय येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास समुपदेशन करणे आवश्यक आहे.
याशिवाय, आपले मूल दत्तक देणाऱ्या जन्मदात्या मातापित्यांचे समुपदेशन अनिवार्य करण्यात आले आहे.
या सर्व आदेशांची सर्व जिल्ह्यांमध्ये, बालविकास केंद्रे आणि संबंधित विभागांकडून सातत्याने अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा सर्व राज्य दत्तक प्रक्रिया संसाधन संस्थांनी करावी असे काराने सांगितले आहे. समुपदेशन ही केवळ एक नियमित प्रक्रिया नाही तर महत्त्वाची मदत यंत्रणा आहे. बालकांचे हित आणि दत्तक प्रक्रियेचे एकंदर यश व शाश्वतता यामध्ये समुपदेशनाचे योगदान मोलाचे असते, यावर प्राधिकरणाने भर दिला आहे.
निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145611)
Visitor Counter : 3