आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
निरामय आरोग्यासाठी आहाराच्या आरोग्यदायी सवयींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने कार्यालयांमध्ये पदार्थांमधील तेल आणि साखरेच्या प्रमाणाची माहिती प्रदर्शित करावी अशा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना
विविध अन्न पदार्थांमध्ये लपलेल्या चरबी आणि अतिरिक्त साखरेबाबत सावध वर्तणुकीसाठी सूचना म्हणून हे बोर्ड काम करतील
काही अन्न पदार्थांवर 'सावधानतेचा इशारा देणारे लेबल्स' लावण्याचे निर्देश या सूचनेत दिलेले नाहीत
केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारतीय खाद्यपदार्थ आणि पदपथावर मिळणाऱ्या समृद्ध खाद्यपदार्थांच्या संस्कृतीला लक्ष्य करत नाही
Posted On:
15 JUL 2025 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2025
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समोसा, जिलेबी आणि लाडू यांसारख्या खाद्य पदार्थांवर सावधानतेचा इशारा देणारे लेबल्स लावण्याचे निर्देश दिल्याचा दावा करणारे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. प्रत्यक्षात माध्यमांनी दिलेले वृत्त दिशाभूल करणारे, चुकीचे आणि निराधार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाअंतर्गत एक स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामध्ये लॉबीज, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बैठक कक्ष यांसारख्या कार्यालयीन ठिकाणी विविध खाद्य पदार्थांमध्ये लपलेली चरबी आणि अतिरिक्त साखर यांच्या हानीकारक सेवनाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शक सूचना केली आहे. देशात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना, या फलकांवरील माहितीमुळे कर्मचाऱ्यांना दररोज स्मरण होऊ शकेल.
मात्र आरोग्य मंत्रालयाने विक्रेत्यांकडे विक्रीला असलेल्या खाद्यपदार्थांवर सावधानतेचा इशारा देणारी लेबल्स लावण्याचे निर्देश दिलेले नाहीत आणि मंत्रालय भारतीय खाद्यपदार्थांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत नसून भारताच्या समृद्ध स्ट्रीट फूड संस्कृतीला लक्ष्य करण्याचा हेतू नाही.
विविध अन्न पदार्थांमध्ये लपलेल्या चरबी आणि अतिरिक्त साखरेबाबत सावध वर्तणुकीसाठी सूचना म्हणून ही सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आली आहे आणि कोणत्याही विशिष्ट खाद्य पदार्थाबाबत नाही. या सूचनेमध्ये फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त पर्याय सुचवले असून आरोग्यदायी पोषक जेवणाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच व्यायामासाठी अल्पसा विराम किंवा ब्रेक घेणे, लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करण्यासारख्या शारीरिक हालचाली करणे आणि चालण्यासाठी मार्ग तयार करणे यांसारखे आरोग्यपूर्ण संदेशही देण्यात आले आहेत.
हा उपक्रम राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रम (NP-NCD) अंतर्गत मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचा एक भाग आहे. तेल आणि साखरेचे अतिसेवन हे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि जीवनशैलीशी संबंधित इतर आजारांच्या वाढत्या प्रमाणाचे प्रमुख कारण आहे.
* * *
सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144979)
Visitor Counter : 6